नांदगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव शाळेत अशोक कुमावत सरांचे व्याख्यान

फाटक्या चड्डीपासून गल्ली ते दिल्लीपर्यंत प्रवास : कवितांनी पाणावले डोळे, ४३ वर्षांनी त्याच शाळेत झाला गौरव! 
  क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या जन्मभूमीत नांदगाव तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर वेहेळगाव शाळेत अशोक कुमावत सरांच्या व्याख्यानाने नवचैतन्य
नाशिक - माझे कपडे फाटके होते, दप्तर फाटके होते, पण स्वप्न फाटके नव्हते... या एका वाक्याने सभागृहात शांतता पसरली.
 क्रांतिवीर वसंतराव नाईक यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेल्या त्यांच्या जन्मभूमीत एका भाग्यवान सुपुत्राचा सन्मान सोहळा शिक्षक दिनी पार पडला. १९८३ साली ज्या शाळेत हा विद्यार्थी फाटक्या चड्डीत आणि अनवाणी पायाने शिकला, रद्दीच्या कागदाच्या शिवलेल्या वह्या आणि वडिलांनी उसन्या-पासण्या आणलेल्या जुन्या पुस्तकांवर शिक्षण घेतले, ज्या शाळेचे वर्ग गावच्या पडक्या मारुती, विठ्ठल आणि राम मंदिरात भरायचे, त्या आज भव्य दिमाखात उभ्या असलेल्या वैभवशाली  शाळेत ४३ वर्षानंतर ५ सप्टेंबर रोजी त्याच विद्यार्थ्याचा प्रमुख व्याख्याता म्हणून गौरव झाला.
हे भाग्यवान व्यक्तिमत्व म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार विजेते, लेखक, कवी मा. अशोक कुमावत सर.
 त्यांनी आपल्या सुरेल व संवेदनशील कवितांनी विद्यार्थी आणि गावकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. 'गल्ली ते दिल्ली' हा आपला संघर्षमय प्रवास उलगडून विद्यार्थ्यांच्या मनात नवचैतन्याची दृष्टी उभी केली.
 आजपर्यंत महाराष्ट्रात शेकडो शाळा-कॉलेजात व्याख्याने दिली, परंतु हा शिक्षक दिनाचा सन्मान मला दिल्लीला २०११ साली मिळालेल्या राष्ट्रपती पुरस्कारापेक्षा मोठा आणि अभिमानाचा क्षण वाटतो, अशी भावनिक प्रतिक्रिया कुमावत सरांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना संदेश देताना त्यांनी शिक्षक आणि आईवडिलांना विसरू नका याचे प्रेरक उदाहरणे दिली.
क्रांतिवीर वसंतराव नाईक यांची प्रेरणा घेऊन गावातील अनेक तरुण आज शिक्षक, पोलीस, देशसेवा, एस.टी. सेवेत कार्यरत असून प्रत्येक घरात नोकरदार आहे.हा या शाळेचा अनमोल ठेवा आहे.असे ते म्हणाले. संस्था संचालक टी. एम.डोंगरे,किशोरभाऊ लहाने,रमेश वाघ यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास ११०० विद्यार्थी, 35 शिक्षक,ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिक्षणाधिकारी मा. जयवंत भाबड यांच्या पुढाकाराने दोन डिजिटल वर्गाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षकांचा ग्रामस्थांच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.किशोरभाऊ लहाने यांनी डिजिटल वर्गासाठी 21000 रुपये देणगी दिली.
व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक टी.एम. डोंगरे,प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक किशोर लहाने,संस्थेचे संचालक रमेश वाघ ,संस्थेचे शिक्षणाधिकारी जयवंत भाबड, शिक्षण समिती अध्यक्ष देविदास थोरे, निळू मामा सानप,हिरालाल सानप,प्राचार्य भारत भाबड, पर्यवेक्षक संजय डोमाडे आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.
फाटक्या चड्डीतील विद्यार्थी ते राष्ट्रपती पुरस्कारापर्यंतचा हा प्रवास उपस्थितांच्या कायम स्मरणात राहील.प्रास्ताविक प्राचार्य भारत भाबड यांनी,सूत्रसंचालन नागरे सर आणि आभार पर्यवेक्षक संजय डोमाडे यांनी मानले.

टिप्पण्या