नाणार, बारसू मधील जमीन मालकांनी रिफायनरी प्रकल्पासाठी संमती दिली होती त्यामुळे त्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पच झाला पाहिजे: विनायक कदम यांची मागणी

राजापूर तालुक्यामध्ये धोपेश्वर बारसू सोलगाव कोणता तरी खाजगी प्रकल्प येणार अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान राजापूर तालुक्यातील राजापूर नगर परिषदेसह नाणार, धोपेश्वर बारसू परिसरातील जमीन मालकांनी रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी संमती दिलेली होती त्यामुळे या ठिकाणी अन्य कुठलाही प्रकल्प न होता किंवा कुठलीही खाजगी कंपनी न येता त्या ठिकाणी रिफायनरी कंपनीच झाली पाहिजे अशी मागणी रिफायनरी प्रकल्प समर्थक विनायक कदम यांनी केली आहे. 

सरकारी प्रकल्प आल्यानंतर त्या ठिकाणी जनतेच्या मागण्या मान्य केल्या जातात. शेतकऱ्यांचे म्हणणे काय आहे ते समजून घेतले जाते. रिफायनरी प्रकल्प त्यावेळेस सुमारे तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक घेऊन आपल्या राजापूर तालुक्यात येणार होता. त्या प्रकल्पाला नाणार, धोपेश्वर, बारसू या भागातील जमीन मालकांनी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यासाठी संमती दिली होती. त्याचप्रमाणे राजापूर नगर परिषदेने देखील ठराव करून रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थन दर्शवले होते. एवढेच नव्हे तर तालुक्यातल्या अन्य काही ग्रामपंचायतींनी देखील रिफायनरी समर्थनार्थ ठराव देखील करून दिले होते. 

रिफायनरी प्रकल्प झाल्यास राजापूर तालुक्याचा कायापालट होऊ शकतो. शिवाय हा पर्यावरण पूरक प्रकल्प असून त्यामुळे निसर्गाची हानी होणार नाही. मात्र सध्या बारसू धोपेश्वर परिसरामध्ये कुठलीतरी खाजगी कंपनी आणण्याचा प्रयत्न काही मंडळींकडून केला जात आहे. खाजगी कंपनी येणार असती तर राज्याचे मुख्यमंत्री यांनी याबाबत काहीतरी सुतवाच केले असते मात्र केंद्र व राज्य सरकारकडून राजापूर तालुक्यात कोणता प्रकल्प उभारावा याबाबत काहीही चर्चा सुरू नसताना रिफायनरी प्रकल्पाच्या ऐवजी दुसरा प्रकल्प आणणे व त्याबाबत लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करणे हे कितपत योग्य आहे. 

आर आर पी सी एल कंपनीच्या माध्यमातून सरकारी प्रकल्प असल्याने त्याचा जनतेला थेट फायदा होणार आहे. अजूनही रिफायनरी प्रकल्पासाठी संपूर्ण राजापूर तालुक्यातील जनतेमध्ये समर्थनाची भूमिका आहे. त्यामुळे सरकारने या भागामध्ये कुठलाही खाजगी प्रकल्प न आणता त्या ठिकाणी सरकारी रिफायनरी सारखा प्रकल्प आणावा अशी मागणी विनायक कदम यांनी केली आहे. 

टिप्पण्या