चांदोर ग्रामस्थांना ३ महिने रेशनच मिळत नाही? रेशन दुकानाची तक्रार करण्यासाठी गावातील शेकडो महिला जिल्हा पुरवठा कार्यालयात धडकल्या

रत्नागिरी तालुक्यातील चांदोर गावातील रास्त भाव दुकानातून गेली तीन महिने रेशनच मिळाले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. रेशन दुकानात गेल्यावर त्या ठिकाणी आमचं पॉस मशीन वर थम्पिंग केले जाते मात्र प्रत्यक्षात रेशन दिले जात नाही अशी तक्रार इथल्या महिलांनी केली आहे. आज चांदोर गावातील शेकडो महिला रत्नागिरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाकडे धडकल्याने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. रेशन दुकानात आलेले हजारो किलो रेशन धान्य नेमके गेले तरी कुठे असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. 

दरम्यान या प्रकरणाबाबत तालुका पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्यांनी संबंधित रेशन दुकानांमध्ये जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी काहीतरी गडबड झाली असल्याचे दिसून येत असून रेशन दुकानाचा कारभार संशयास्पद असल्याचे नमूद केले आहे. दरम्यान पुढील सुनावणी 24 तारखेला लावण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

पुरवठा विभागाकडून पाहणीसाठी टीम गेली असता चांदोर रेशन दुकानदाराला डिसेंबर ते मार्च महिन्यात अंत्योदय योजनेतून गहू १५.४५ क्विंटल व तांदूळ २३.७५ क्विंटल एवढा सप्लाय देण्यात आला होता. तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतून गहू ७४.७८ क्विंटल व तांदूळ १३७.५७ क्विंटल एवढा सप्लाय देण्यात आला होता. यापैकी ऑनलाइन (सेल) विक्री अंत्योदय गहू १४.०५ क्विंटल व अंत्योदय तांदूळ २२ क्विंटल एवढी विक्री दिसून आली. तसेच प्राधान्य गहू ६७.४६ क्विंटल, प्राधान्य तांदूळ १२८.२० क्विंटल एवढी विक्री दिसून येते. मात्र त्यामधील सप्लाय आणि विक्री यामधील जो फरक आहे तेवढे धान्य त्या चांदोर रास्त दुकानात दिसून आला नाही. 

चांदोर गावातील महिलांचे म्हणणे आहे की आमच्याकडून रेशन दुकानात गेल्यावर पॉस मशीनवर थम्पिंग करून घेण्यात आले मात्र प्रत्यक्षात रेशन दिले नाही. हा प्रकार जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे तीन महिने सुरू आहे. यासंदर्भात आज जिल्हा पुरवठा कार्यालयामध्ये सुनावणी लावण्यात आली होती या सुनावणीला तक्रारदार महिला हजर राहिल्या मात्र संबंधित रेशन दुकानदार हजर राहिले नाहीत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे पुढील सुनावणी 24 तारखेला लावण्यात आली आहे. प्रथम दर्शनी संबंधित रेशन दुकानाच्या घडलेल्य प्रकाराबाबतीत
 संशयास्पद व्यवहार दिसून येत असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे संबंधित रेशन दुकानदारावर काय कायदेशीर कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

टिप्पण्या