गुहागर तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठीच मनसे निवडणूक रिंगणात - प्रमोद गांधी
आबलोली (संदेश कदम)
बेरोजगारीचा प्रश्न केंद्रस्थानी, विकासात अजूनही मतदारसंघ मागेच
गुहागर विधानसभा मतदारसंघात विकासाची कामे आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्यांनी केलेली नाहीत. आरोग्य, शिक्षण याबरोबरच बेरोजगारीचा प्रश्न आजही गंभीर आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळणेही कठीण झाले आहे. केवळ पाखाड्या, रस्ते झाले म्हणजे विकास नाही. उद्योगधंदे, पर्यटन विकास या माध्यमातून गुहागर अजूनही मागे आहे. त्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आणि गुहागर तालुक्याचा विकासात्मक कायापालट करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडणूक रिंगणात उतरली असून सोमवार दि. २८ रोजी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी शृंगारतळी येथील आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
गुहागरमध्ये आजपर्यंत दोन घराण्यांभोवतीच सत्ता राहिली आहे. तेच येथील प्रस्थापीत आहेत. सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. स्थानिक आमदारांकडे एखाद्या गावातला कार्यकर्ता काम घेऊन गेला तर तुमच्या गावातून मतदान मला किती झाले असा प्रश्न केला जातो. जलजीवनसारख्या पाणीयोजना अजूनही रखडलेल्या आहेत. गुहागर-विजापूर महामार्गाची ५ वर्षात कशी अवस्था झाली आहे. आरोग्य यंत्रणा सुस्थितीत नाही. उच्च शिक्षणासाठी मुलांना बाहेर जावे लागते. उद्योगधंदे नसल्याने येथील तरुण मुंबई, पुणेसारख्या शहरात नोकरी-व्यवसायासाठी जातो. हे वर्षानुवर्षे आमदारकी सांभाळणाऱ्या नेत्यांना दिसून येत नाही. केवळ निवडणुका आल्या की, भूमीपूजने करायची. निवडून आल्यानंतर सुरुवातीपासून ही भूमीपूजने का केली जात नाहीत, असा सवाल प्रमोद गांधी यांनी उपस्थित केला आहे.
माझ्यासमोर तगडा उमेदवार कोणीच नाही असे म्हणणाऱ्या आ. भास्कर जाधव यांचा तो अहंकार आहे. ते पक्ष म्हणून असे बोलत नाही. स्वतःचा मोठेपणा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. मी म्हणजे विकास हा त्यांचा भ्रम आहे. गुहागर तालुक्यात विकास झालेलाच नाही. त्यामुळे विकास हाच ध्यास घेऊन मनसे निवडणूक रिंगणात उतरली आहे. राजसाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व घेऊनच आम्ही यावेळी गुहागरमध्ये परिवर्तन घडवून आणणार आहोत. लोकसभा निवडणूक दरम्यान, राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता तो काही मागण्यांसंदर्भात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी या आग्रही मागण्या सादर केल्या होत्या. त्यातील एका मागणीची सोडवणूक झाली असून मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा हे ठाकरे यांचे मोठे यश असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा