कांद्याच्या दरात वाढ

 


कांद्याच्या दरात वाढ

किरकोळ बाजारात ४० रुपयांचा भाव; हवामान बदलामुळे साठवणीतील कांदाही खराब

 मार्च ते एप्रिल महिन्याच्या सुमारास निघणाऱ्या उन्हाळी कांद्याची व्यापाऱ्यांकडून साठवणूक केली जाते. जुलैनंतर या कांद्याची मागणीनुसार विक्री केली जाते. यावर्षी हवामान बदलामुळे साठवणुकीतच हा कांदा मोठय़ा प्रमाणात खराब झाला असल्याने त्याची आवक कमी होत आहे. यामुळे मागील आठवडय़ाभरापासून जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी दिसून येत आहे.

एपीएमसीमधील घाऊक बाजारात सध्या २३ ते ३५ रुपये किलोने कांदा विकला जात आहे. तर ठाण्यात आणि इतर शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांद्याचे दर ४० ते ४५ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. पावसाळी कांदा बाजारात विक्रीसाठी येण्यास अजून काही दिवसांचा अवधी बाकी असल्याने येत्या काही दिवसात कांद्याचे दर अजून वाढणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

मागील महिन्याभरापासून हवामानात सातत्याने बदल होत आहेत. काही दिवस अति उष्णता आणि त्यात अचानक सुरू होणारा मुसळधार पाऊस अशा पद्धतीचे वातावरणात बदल दिसून येत आहेत. या वातावरण बदलाचा आणि अवकाळी पावसाचा कांद्याच्या आवकेवर परिणाम होत आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने डिसेंबर ते जानेवारी महिन्यात उन्हाळी कांद्याची लागवड केली जाते.

डिसेंबर ते एप्रिल असा पाच महिन्यांचा कालावधी या उन्हाळी कांद्याला लागतो. इतर कांद्यापेक्षा हा कांदा यायला काळ जास्त लागत असल्याने याला फुरसती कांदा म्हणून देखील ओळखले जाते. हा कांदा जास्त काळ टिकत असल्याने दरवर्षी शेतकऱ्यांकडून आणि व्यापाऱ्यांकडून याची योग्य पद्धतीने चाळींमध्ये साठवण केली जाते. जुलै महिन्याच्या शेवटानंतर हा कांदा जिल्ह्यातील घाऊक आणि किरकोळ  बाजारात विक्रिसाठी उपलब्ध होतो. बहुतांश व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी साठवणूक केलेला कांदा यावेळी अवकाळी पावसामुळे काही अंशी खराब झाला आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा एक ते दोन महिने आधीच यंदा उन्हाळी कांद्याची आवक कमी होत आहे. 

उन्हाळी कांद्याचा हंगाम संपत आल्यावर बाजारात लाल कांदा म्हणजेच पावसाळी कांदा विक्रीसाठी येत असतो. त्यामुळे कांद्याच्या दरात काही अंशी स्थिरता पाहायला मिळते. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत पावसाळी कांद्याचे पीक घेतले जाते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हा कांदा विक्रीसाठी दाखल होतो आणि मे ते जून महिन्यापर्यंत हा आणि सरकारतर्फे बाहेर देशातून आयात केलेला कांदा बाजारात उपलब्ध असतो. या वर्षी मात्र वातावरणातील बदलांमुळे कांदा विक्रीचे हे सर्व चक्र बिघडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारात सध्या जुना कांदा उपलब्ध नाही, तर नवीन कांदा येण्यास काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्यामुळे त्याचा परिणाम दिसून येत आहे.

....................................

टिप्पण्या

news.mangocity.org