“हा तर टाटा इफेक्ट”: २०१७ नंतर पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना…


“हा तर टाटा इफेक्ट”: २०१७ नंतर पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना…

 Tata Air India

तोटय़ात असलेल्या ‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी टाटा समूहाची बोली सर्वश्रेष्ठ ठरली असून, समाजमाध्यमांवर मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत राहिलेल्या या निर्णयाला सरकारने अद्याप अधिकृतपणे दुजोरा मात्र दिलेला नाही. मात्र असं असलं तरी एअर इंडियाला उभारी देणाऱ्या या बातमीचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कंपनी टाटांच्या ताब्यात जाण्याआधीच दिसू लागलाय. २०१७ नंतर पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी पगार देण्यात आलाय. मागील अनेक वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना अनियमित वेतनाचा फटका बसला असतानाच हा नवीन टाटा इफेक्ट त्यांना सुखद धक्का देणार आहे.

तो खर्चही सरकार करणार

याच प्रकारे कंपनीने पीएफ खात्यांवरील रक्कम वळवण्यासाठी लागणारा खर्च स्वत: उचलणार असल्याचाही निर्णय घेतलाय. यापूर्वी कंपनीने हा खर्च कर्मचाऱ्यांना करावा लागेल असं म्हटलं होतं. या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी विरोध केलेला.

अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगट घेणार निर्णय


‘एअर इंडिया’च्या खरेदीसाठी वेगवेगळ्या चार निविदा आल्या असल्या तरी सर्वाधिक बोली लावणारी ‘टाटा सन्स’ या स्पर्धेत आघाडीवर आहे. ‘स्पाइसजेट’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनीही निविदा दाखल केली आहे.  अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिगटाने ‘टाटा’च्या बोलीसंदर्भात निर्णय घेणार आहेत. निर्धारित राखीव किमतीच्या आधारावर वित्तीय निविदांद्वारे लावण्यात आलेल्या बोलीचे मू्ल्यमापन करण्यात आले असून, सर्वाधिक बोली ‘टाटा सन्स’कडून आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली निर्गुतवणुकीसाठी स्थापन केलेल्या सचिवस्तरीय समितीकडून तपासणीही पूर्ण झाली आहे. त्यांनी आपली शिफारस अंतिम निर्णयासाठी ‘एअर इंडिया’च्या खासगीकरणासाठी स्थापण्यात आलेल्या शहा यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिगटाकडे सादर केल्याचे सांगण्यात आलं आहे.

२०२० पासून सुरू केलेली प्रक्रिया


‘एअर इंडिया’मधील १०० टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया केंद्राने जानेवारी २०२० पासून सुरू केली होती. शिवाय, तिच्या उपकंपन्या म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट्स सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सा विकण्याचे सरकारने प्रस्तावित केले. मात्र करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर एप्रिल २०२१ मध्ये सरकारने उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती.

कर्जाचा बोजा किती?


एअर इंडियावरील एकूण थकीत कर्ज ३१ मार्च २०१९ अखेर ६०,०७४ कोटी रुपये आहे. खरेदीदाराकडून यापैकी २३,२८६ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाचा भार उचलला जाणार आहे. २००७ पासून ही कंपनी तोटयात आहे.

टाटा पुन्हा होणार मालक


‘एअर इंडिया’ची मालकी ‘टाटा’कडे गेल्यास, त्या उद्योग समूहाला त्यांनीच स्थापलेल्या या हवाई सेवेची मालकी ६७ वर्षांनंतर पुन्हा मिळणार आहे. जेआरडी टाटा यांनी १९३२ साली ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे, पुढे १९४६ मध्ये ‘एअर इंडिया’ असे नामकरण केले गेले. १९४८ मध्ये ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ने युरोपसाठी उड्डाणेही सुरू केली. मात्र १९५३ मध्ये सरकारने एअर इंडियावर ताबा घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले.


....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org