“करोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले मुंबादेवीचे दर्शन


Chief Minister Uddhav Thackeray visited Mumbadevi with his family


“करोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा”; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब घेतले मुंबादेवीचे दर्शन

दीड वर्षानंतर अखेर महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या परवानगीने घटस्थापनेच्या मुहूर्तावर गुरुवारपासून भाविकांसाठी मुंबईसह राज्यातील मंदिरे खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये राज्याच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांनी पहाटेच जाऊन मंदिरे खुली करत दर्शन घेतले आहे. त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक मुंबईचे कुलदैवत असणाऱ्या मुंबादेवीचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यादेखील उपस्थित होत्या.

करोनाच्या काळात सश्रद्ध माणसांना आधार आणि जगण्याचे मानसिक बळ दिले असे मानणाऱ्या भाविकांसाठी राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे आजपासून खुली करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईतील मुंबादेवी मंदिरात जाऊन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले. यावेळी त्यांनी मंदिराचे व्यवस्थापक आणि पुजाऱ्यांशी संवाद साधला. “आपली मंदिरे आणि प्रार्थनास्थळे भक्तांसाठी खुली होत आहेत. माझी सर्व जनतेला आणि भक्तांना विनंती आहे, की आनंदात राहा, मात्र करोनाचे नियम पाळून सुरक्षित राहा”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक व प्रार्थना स्थळे उघडण्याचा निर्णय झाल्यानंतर गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासमवेत मुंबादेवी येथे दर्शन घेतले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. करोनाचे सावट कायमसाठी जाऊ दे, अशी प्रार्थना मुंबादेवीच्या चरणी आपण केली असून धार्मिक स्थळांवर आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करणे सुरूच ठेवण्याची जबाबदारी सर्वानी पार पाडली पाहिजे असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छाही दिल्या.

सर्वच धार्मिक स्थळांवर विश्वस्त व पुजारी यांनी कोरोना संसर्गाचा धोका लक्षात ठेवून शिस्तबद्धरित्या भक्त आणि नागरिकांच्या दर्शनाची व्यवस्था केली तसेच परिसराची वरचेवर स्वच्छता करणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतूनाशकांचा वापर करणे असे केले तर एक चांगले उदाहरण आपण घालून देऊ शकतो असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सिद्धिविनायक तसेच इतरही काही प्रमुख मंदिरांमध्ये क्यूआर कोड व तंत्रज्ञान वापरून दर्शन व्यवस्था केल्याबद्धल कौतूक केले आहे.

गुरुवारी पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर राज्याचे परळी वैजनाथ या १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आमदार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी पहाटेच मंदिरात जाऊन मंदिराचे दरवाजे उघडत सर्व प्रथम दर्शन घेतले.

घटस्थापनेपासून राज्यातील सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसांपासूनच मंदिरांमध्ये भाविक दर्शनासाठी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने मंदिर प्रशासनाने गर्दीच्या व्यवस्थापनाची तयारी केली आहे. करोना प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशातून गर्दी टाळण्यासाठी बंद असलेली मंदिरे गुरुवारपासून खुली होत असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील सिद्धिविनायक, महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर प्रशासनाने सुरक्षिततेची विशेष काळजी घेतली जात आहे. दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने भाविकांना ऑनलाइन पूर्वनोंदणीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.

....................................

२ लाख हून अधिक वाचक
५००+ व्हॉट्सॲप ग्रुप
ऑनलाईन व प्रिंट मीडिया
------------------------------
सत्यमेव जयते ! 
24x7 
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
 RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी  व  पत्रकार होण्यासाठी  कॉल करा : 8448440256

टिप्पण्या

news.mangocity.org