राज्यात बटाट्याची प्रचंड आवक

 

राज्यात बटाट्याची प्रचंड आवक

    राज्यात बटाट्याची प्रचंड आवक


उत्तर प्रदेशातील आग्रा, तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशातील इंदूर भागात बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.


उत्तरेतील राज्यांकडून पुरवठा; मागणी आटल्याने दरांत घट


 उत्तरेकडील राज्यातील बटाटा उत्पादक शेतकऱ्यांनी शीतगृहात साठविलेला बटाटा मोठ्या प्रमाणावर बाजारात विक्रीसाठी पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बटाट्याची मोठी आवक होत असली तरी आवकेच्या तुलनेत बाजारात बटाट्याला फारशी मागणी नसल्याने बटाट्याचे दर प्रतिकिलो २० ते २५ रुपये असे झाले आहेत. शीतगृहांबरोबर केलेले करार संपत आल्यामुळे तेथील बटाटा बाजारात पाठवण्यास सुरुवात झाली आहे.

किरकोळ बाजारात एक किलो बटाट्याची विक्री प्रतवारीनुसार ४० ते ६० रुपये किलो या दराने केली जात होती. गेल्या महिनाभरापासून बटाट्याच्या भावात घट होत आहे. घाऊक बाजारात एक किलो बटाट्याला प्रतवारीनुसार १० ते १३ रुपये असा दर मिळत आहे. उत्तरेकडील राज्यातून बटाट्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असून मागणीअभावी बटाट्याचे दर यापुढील काळात वाढण्याची शक्यता नाही, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील बटाटा व्यापारी राजेंद्र कोरपे यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशातील आग्रा, तसेच गुजरात आणि मध्य प्रदेशातील इंदूर भागात बटाट्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. सध्या येथील बाजारात दररोज ३० ते ४० गाड्यांमधून बटाटा विक्रीस पाठविला जात असून एका गाडीत साधारणपणे आठशे ते एक हजार किलो बटाटा असतो. मागणीच्या तुलनेत बटाट्याची आवक मुबलक होत आहे.

अपेक्षित मागणी नाही…

करोनाच्या संसर्गामुळे उपाहारागृह तसेच खाणावळ चालकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. विवाह समारंभातील उपस्थिती तसेच खासगी कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. ग्रामीण भागातील आठवडे बाजारही बंद आहेत. त्यामुळे बटाट्याला अपेक्षेएवढी मागणी नाही.

कारण काय?  उत्तरेकडील आग्रा भागात मोठ्या प्रमाणावर शेतक री बटाट्याची लागवड करतात. या भागातील शेतकरी शीतगृहात बटाट्याची साठवणूक करतात. शीतगृहासाठी केलेले बटाटा साठवणुकीचे करार नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात संपतात. त्यामुळे सध्या शीतगृहातील बटाटा बाजारात आणला जात आहे. महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यांत उत्तरेकडून दररोज दोनशे ते अडीचशे गाड्यांमधून बटाटा विक्रीस पाठविला जात आहे.

ठाणे-मुंबईतही मुबलक… वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज ३० ते ४० गाड्यांमधून बटाट्याची आवक होत आहे. घाऊक बाजारात एक किलो बटाट्याची विक्री ९ ते १४ रुपये दराने केली जात आहे. ठाणे, मुंबई, डोंबिवली भागांतील किरकोळ बाजारात बटाट्याची प्रतवारीनुसार २० ते २५ रुपये दराने विक्री केली जात आहे.

उत्तरेकडील राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर बटाटा विक्रीस पाठवीत आहेत. कर्नाटकातील बटाट्याचा हंगाम सुरू झाला आहे. पुढील महिन्यात पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर भागातील बटाट्यांचा नवीन हंगाम सुरू होईल. बटाट्याची आवक आणि मागणी विचारात घेता यापुढील काळात बटाट्याचे दर वाढणार नाहीत. – राजेंद्र कोरपे, बटाटा व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

...................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org