Delta Plus Variant Of Covid 19 : मुंबईत ‘डेल्टा’चे १२८ रुग्ण

Delta Plus Variant Of Covid 19 : मुंबईत ‘डेल्टा’चे १२८ रुग्ण
पहिल्या ‘जिनोम’ चाचण्यांचे निष्कर्ष जाहीर
मुंबई: कस्तुरबामध्ये कार्यरत झालेल्या पहिल्या जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेसिंग) प्रयोगशाळेत १८८ नमुन्यांची चाचणी केली असून यात १२८ रुग्ण डेल्टाबाधित असल्याचे आढळले आहे. अल्फाचे दोन, कप्पा प्रकाराचे २४, तर इतर रुग्ण हे सर्वसाधारण करोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे.
‘जिनोम सिक्वेसिंग’ची पहिली प्रयोगशाळा कस्तुरबामध्ये ४ ऑगस्टपासून सुरू झाली असून यात दोन यंत्रे आहेत. एकाचवेळी ३८४ चाचण्या करण्याची क्षमता आहे. या यंत्रामध्ये पहिली चाचणी नुकतीच करण्यात आली. यात १८८ नमुन्यांची चाचणी केली गेली. चाचण्यांचे अहवाल पालिकेने जाहीर केले आहेत. १८८ पैकी १२८ रुग्ण हे डेल्टाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणाच्या जनुकीय चाचण्या?
जनुकीय चाचणी ही करोनाची सामान्य चाचणी नाही. सगळ्या रुग्णांची जनुकीय चाचणी करण्याची आवश्यकता नाही. खूप दिवस रुग्णालयात दाखल असेलेले, परदेशातून आलेले करोनाबाधित प्रवासी यांचे नमुने घेतले होते. त्याचबरोबर एखाद्या इमारतीत किंवा वसाहतीत एकाच वेळी अनेक रुग्ण आढळून आले तर अशा ठिकाणचे नमुनेही पाठवले होते, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
आधीच्या चाचण्यामध्ये मुंबईत डेल्टा प्लस बाधित ११ रुग्ण आढळले असले तरी त्यात एकही डेल्टा प्लसबाधित नाही, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पालिकेचे आवाहन
डेल्टाचा प्रसार वेगाने होत असल्याचे लक्षात घेता करोना प्रतिबंधक निर्देशांचे कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता आहे. मुखपट्टीचा वापर, सुरक्षित अंतर राखणे, हातांची नियमित स्वच्छता, गर्दी टाळणे यांसारख्या उपाययोजना प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन पालिकेने केले आहे.
२२६ नवे रुग्ण; चौघांचा मृत्यू
मुंबई : मुंबईत सोमवारी २२६ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर चौघांचा मृत्यू झाला. रविवारी के वळ एकाच करोनाबाधिताच्या मृत्यूची नोंद झाली होती. गेल्या वर्षभरात पहिल्यांदाच मृत्यूचा आकडा एक होता. एका दिवसात २९७ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या सात लाख २० हजार १९९ झाली आहे.
ठाणे जिल्ह्य़ात १२० बाधित
ठाणे जिल्ह्य़ात सोमवारी १२० रुग्ण आढळून आले. तर, दोन जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील १२० रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली ३०, ठाणे २८, नवी मुंबई २०, मीरा भाईंदर १५, बदलापूर ११, अंबरनाथ पाच, ठाणे ग्रामीण पाच, उल्हासनगर चार आणि भिवंडीतील दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर, दोन मृतांपैकी कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
‘मंदिरांचा निर्णय तूर्तास नाही, शाळांबाबत विचार सुरू’
मुंबई : बंद असलेली मंदिरे सुरू करण्याचा तूर्तास कोणताही विचार नाही, शाळांबाबत विचारविनिमय सुरू असून लहान मुलांच्या कृतिदलातील डॉक्टरांशी चर्चा होणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. करोनाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येण्याचा इशारा देण्यात आला आहे. पण त्याला घाबरण्याची गरज नाही, आरोग्य विभागाने पूर्ण तयारी केली आहे. रिक्त जागांची भरती केली आहे, प्राणवायू व औषधांचा तुटवडा भासणार नाही. लहान मुलांवर उपचार करण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात आली आहे, असे टोपे म्हणाले.
कला केंद्रे, यात्रांबाबत लवकरच निर्णय!
मुंबई : कला के ंद्रे, आठवडे बाजार आणि यात्रा पुन्हा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी तमाशा कलावंतांच्या शिष्टमंडळाला दिले. मंत्रालयात सोमवारी अखिल महाराष्ट्र संगीत पार्टी तमाशा कलावंत महासंघाचे अध्यक्ष अरुण मुसळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने देशमुख यांची भेट घेतली.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा