पाऊस थांबताच राज्यभर तापमानवाढ

 


पाऊस थांबताच राज्यभर तापमानवाढ

पाऊस थांबताच राज्यभर तापमानवाढ

  हवामानात झपाटय़ाने बदल, उन्हाचा चटका वाढला

 महाराष्ट्र: पावसाने विश्रांती घेताच राज्यातील हवामानात झपाटय़ाने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडय़ातही अचानक वाढ  झाली आहे. पुढील पाच दिवस तरी राज्यात कोणत्याही भागात मोठय़ा पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवडय़ापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती.

अरबी समुद्र आणि किनारपट्टीचा भाग, बंगालचा उपसागर आणि विदर्भ ते पूर्व अरबी समुद्रापर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ांमुळे ऑगस्टमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. सध्या राज्यात पावसास पोषक वातावरण निर्माण होऊ शकेल, असा कोणताही कमी दाबाचा पट्टा नाही. त्यामुळे राज्यात सर्वच ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. काही ठिकाणी कोरडय़ा हवामानाची स्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश भागातून ढगाळ वातावरणही दूर झाल्याने सूर्यकिरणे विनाअडथळा जमिनीपर्यंत येऊन उन्हाचा चटका वाढला आहे.

उकाडय़ात अचानक वाढ झाल्याने घरे, कार्यालयांमध्ये वातानुकूलित यंत्रणा, पंखे आदींचा वापर वाढला आहे. एक ते दोन दिवसांत कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार २७ ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रासह, गुजरात आणि मध्य भारतात बहुतांश भागांत पावसाची उघडीप कायम राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक भागात पावसाचा केवळ हलका शिडकावा होऊ शकतो.

कमाल तापमान सरासरीपुढे

एक ते दोनच दिवसांपूर्वी राज्यात बहुतांश भागांत ३० अंशांच्या खाली असलेले कमाल तापमान आता केवळ महाबळेश्वर वगळता ३० अंशांच्या पुढे गेले आहे. कोकण विभागात मुंबई, रत्नागिरी, अलिबागमध्ये ते सरासरीपेक्षा १ ते २ अंशांनी वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली, सातारा, विदर्भातील नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी, चंद्रपूरमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ातील औरंगाबाद, परभणी, बीडमध्ये ते सरासरीच्या तुलनेत २ ते ३ अंशांनी वाढले आहे.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org