स्क्रब टायफसचा पहिला बळी!


स्क्रब टायफसचा पहिला बळी!

नागपूर : नागपूर विभागात करोना, डेंग्यूनंतर आता स्क्रब टायफस डोके वर काढत आहे. येथे स्क्रब टायफसचे चार रुग्ण नोंदवले गेले असून  एकाचा मृत्यू झाला आहे. हा करोना काळातील या आजाराचा पहिला बळी आहे. शहरात या आजाराचे बरेच रुग्ण असून महापालिकेकडे नोंदणी नसल्याने ते पुढे येत नसल्याची वैद्यकीय क्षेत्रात चर्चा आहे. दगावलेला ५९ वर्षीय रुग्ण पुरुष आहे. तो ९ ऑगस्टला एका रुग्णालयात  दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विभागात आढळलेले चारपैकी ३ रुग्ण हे नागपूर जिल्ह्य़ातील आहेत. शहरातील काही खासगी रुग्णालयांत या आजाराच्या काही रुग्णांवर उपचार सुरू असले तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मात्र त्यांची नोंद नाही. आता हा नवीन आजार आढळल्याने  आरोग्य विभागाने हा आजार वाढू नये म्हणून काळजी घेण्याची गरज आहे. जिल्हय़ात स्क्रब टायफसचा संसर्ग २०१८ मध्ये झाला होता. यावेळी २०१ रुग्णांची नोंद झाली होती तर ३३ जणांचे बळी गेले होते. यानंतर सातत्याने स्क्रब टायफसचे रुग्ण कमी- अधिक प्रमाणात आढळत आहेत. गेल्यावर्षी करोनाच्या काळात हे रुग्ण आढळले नव्हते. परंतु यावर्षी पुन्हा रुग्ण नोंदवल्या गेल्याने चिंता वाढली आहे. नागपूर जिल्हय़ात २०१९ मध्येही २१ रुग्ण आढळले होते, हे विशेष.

स्क्रब टायफस म्हणजे काय?

ट्रॉम्बिक्युलीड माईट्सचे लारव्हे; ज्याला चिगर माईट्स म्हणतात त्याच्यातील ओरिएन्शिया सुसुगामुशी जंतू मानवी शरीरात प्रवेश केल्याने स्क्रब टायफसचा धोका आहे. या रुग्णाने वेळीच योग्य उपचार न घेतल्यास साधारणत: ५० टक्के रुग्णांना मेंदूचा आजार होतो.

......................................
------------------------------

Comments