‘एमआयडीसी’च्या परीक्षा अखेर सरळसेवा पद्धतीनेच

‘एमआयडीसी’च्या परीक्षा अखेर सरळसेवा पद्धतीनेच
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे (एमआयडीसी) दोन वर्षे प्रलंबित असलेली परीक्षा अखेर २० ऑगस्ट ते १० सप्टेंबरदरम्यान ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. परंतु, ८६५ पदांसाठी होणारी ही परीक्षा सरळसेवा ऐवजी ‘आयबीपीएस’कडून (इन्स्टिटय़ूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन) घेण्यात येणार होती. ऐन वेळेवर परीक्षा पद्धतीत बदल करण्यात आल्याने परीक्षार्थीचा विरोध होत होता. ही बाब लक्षात घेऊन आता ही परीक्षा सरळसेवा पद्धतीनेच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
एमआयडीसीने २०१९ मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून ऑनलाईन अर्ज मागवले होते. मात्र त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे परीक्षा कधी होणार, असा प्रश्न उमेदवारांकडून सातत्याने विचारण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर एमआयडीसीकडून परिपत्रक प्रसिद्ध करून परीक्षेबाबत माहिती देण्यात आली आहे. या परीक्षेसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज स्वीकारण्यात आले होते. त्यामुळे ही भरती प्रक्रिया सरळसेवा परीक्षा पद्धतीने होईल, असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले होते. मात्र, आता ही परीक्षा आयबीपीएस घेणार असल्याचे सांगण्यात आले. मार्च २०२१ मध्ये झालेल्या एका परीक्षेतही आयबीपीएसने ही परीक्षा घेतली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. हीच पद्धती आता ८६५ पदांसाठी होणाऱ्या भरती प्रक्रियेमध्येही अवलंबिली जाणार होती. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला होता.
सरळसेवा भरती आणि आयबीपीएस परीक्षा पद्धतीत टोकाचे अंतर आहे. त्यामुळे परीक्षा देणे अडचणीचे होणार असल्याने विद्यार्थ्यांनी याला प्रचंड विरोध केला. हा विरोध बघता आता एमआयडीसीने ही परीक्षा सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारेच घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आयबीपीएसला विरोध का?
परीक्षांच्या तारखा जाहीर होताना परीक्षा पद्धतीही जाहीर केली जाते. बँकिंग क्षेत्रातील परीक्षा आयबीपीएसकडून घेतल्या जातात तर अन्य परीक्षा सरळसेवा पद्धतीने होतात. ज्यामध्ये सामान्य ज्ञान विषय असतो. ऋणात्मक गुण नसतात. आयबीपीएसकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतीत मात्र गणित, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी असते. शिवाय यामध्ये ऋणात्मक गुण असतात. त्यामुळे आयबीपीएसकडून होणाऱ्या परीक्षेला विरोध होता.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment