स्वातंत्र्यदिनापासून राज्यात ई-पीक पाहणी


स्वातंत्र्यदिनापासून राज्यात ई-पीक पाहणी
Advertisement

स्वातंत्र्यदिनापासून राज्यात ई-पीक पाहणी

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाइल अ‍ॅपचे लोकार्पण

मुंबई: सरकारच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना होणारा लाल फितीचा त्रास कमी करण्यासाठी राज्यात स्वातंत्र्यदिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना आपल्या पिकाची माहिती स्वत:च सरकारकडे नोंदवणे शक्य होणार असून हा प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य दिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृह येथे या प्रकल्पाच्या मोबाइल अ‍ॅपचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादा भुसे, महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.नितीन करीर, टाटा ट्रस्टचे मुख्य सल्लागार जयंतकुमार बांठिया यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण नवनवीन प्रयोग करून शेतकऱ्यांचे कष्ट कमी करत आहोत. महाराष्ट्राचा हा प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच दररोज हवामानात बदल होत आहे. कधी अतिवृष्टीमुळे तर कधी पाऊस न पडल्याने पिकांचे नुकसान होते. अशा काळात शासनाला शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई देताना अनेक अडचणी येतात. या डिजिटल प्रणालीमुळे शेतकऱ्यांना मदत होणार आहे, असेही ठाकरे म्हणाले. पुढील १५ दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांना आपल्या पिकाची नोंद अ‍ॅपवर कशी करायची याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑनलाइन सातबारामध्ये सुलभता आणण्याबरोबरच आता ८ अ सुद्धा ऑनलाइन करण्यात आला आहे, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

प्रकल्प काय

शेतकऱ्यांना स्वत:च्या शेतातील पिकांची सात बारामध्ये स्वत: नोंद करता येणार असल्याने पीक पेरणी आणि पिकांच्या परिस्थितीचा अंदाज करता येणार आहे. ई पीक पाहणी प्रकल्पामुळे गाव, तालुका आणि जिल्हानिहाय प्रत्येक पिकाचे क्षेत्र समजणार आहे. शेतीसाठी पीक कर्ज आणि पीक विमा सुलभरीत्या उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in



Comments