घरातून पळून आलेली मुले रेल्वेच्या सतर्कतेने पुन्हा पालकांकडे

घरातून पळून आलेली मुले रेल्वेच्या सतर्कतेने पुन्हा पालकांकडे
सात महिन्यांत विविध स्थानकांतून ४७७ मुलांची सुखरूप रवानगी
महाराष्ट्र: घरगुती वाद किंवा इतर काही कारणांनी घरातून पळून जाणारी अनेक मुले-मुली बहुतांश वेळेला रेल्वे गाडय़ांचा आधार घेतात. अशा मुलांना हेरून त्यांना चुकीच्या लोकांच्या हाती जाण्यापासून रोखण्यासाठी मध्य रेल्वेकडून महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसह राज्यातील विविध स्थानकांमध्ये गेल्या सात महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या ४७७ मुलांना शोधून त्यांना सुखरूप पालकांच्या हवाली करण्यात आले आहे. त्यात १६७ मुलींचा समावेश आहे.
राज्यातून किंवा देशाच्या विविध भागातून रेल्वेच्या माध्यमातून स्थानकांत येणाऱ्या आणि एकटय़ाने फिरणाऱ्या मुला-मुलींकडे रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांकडून सातत्याने नजर ठेवली जाते. तिकीट तपासनीसांकडूनही याबाबत सतर्कता बाळगली जाते. त्यातून अनेक मुले सापडतात. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जाते. मुलांसाठी काम करणाऱ्या ‘चाइल्डलाइन’सारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांची तक्रार जाणून घेऊन समजूत काढली जाते आणि या मुलांना पुन्हा त्यांच्या आई-वडिलांकडे पोहोचविले जाते. राज्यातील विविध स्थानकांच्या फलाटांवर त्याचप्रमाणे रेल्वे गाडय़ांमध्ये गेल्या सात महिन्यांत घरातून पळून आलेले ३१० मुलगे आणि १६७ मुली सापडल्या. त्यांना त्यांच्या मूळ गावी पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून सर्वाधिक १३० मुलगे आणि ४१ मुलींना त्यांच्या आई-वडिलांकडे सुखरूप पोहोचविण्यात आले आहे. त्या पाठोपाठ मुंबई विभागातून १०४ मुलगे आणि ६२ मुली, नागपूर विभागातून २२ मुलगे, १८ मुली, भुसावळ विभागातून ३९ मुलगे, ३१ मुली, तर सोलापूर विभागातून १५ मुलगे आणि १५ मुलींना त्यांच्या पालकांकडे पोहोचविण्यात आले आहे. एकटय़ा जुलै महिन्यांत ४७ मुले आणि २६ मुलींना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी याबाबत सांगितले, की घरातून पळून आलेल्या मुला-मुलींना पुन्हा त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून रेल्वे करते आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वेतील कर्मचाऱ्यांची भूमिका यात महत्त्वाची आहे.
चांगले जीवन अन् मोहक दुनियेच्या शोधात..
घरातून पळून आलेली आणि स्थानकावर आढळून येणाऱ्या मुला-मुलींना विश्वासात घेऊन सामाजिक संस्थांच्या माध्यमातून चौकशी केली जाते. त्यात ही मुले त्यांच्या अडचणी आणि घरातून पळून जाण्याची कारणे सांगतात. त्यात प्रामुख्याने घरगुती कारणे आणि वाद असतात. मात्र, चांगले जीवन जगण्याची इच्छा आणि एका मोहक दुनियेच्या शोधातही अनेक मुले-मुली घरातून पळून जात असल्याचेही मध्य रेल्वेच्या या उपक्रमातून स्पष्ट झाले आहे. मुंबईत येऊन चित्रपटात अभिनेता-अभिनेत्री होणे किंवा मॉडलिंगमध्ये कारकीर्द करण्यासाठी घर सोडल्याचेही काही मुला-मुलींनी त्यांच्या चौकशीत सांगितले.
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा