मेळघाटातील रेल्वेवरून पुन्हा राजकारण

 


मेळघाटातील रेल्वेवरून पुन्हा राजकारण

मेळघाटातील रेल्वेवरून पुन्हा राजकारण

अमरावती : अकोला, अकोट, धूळघाट, डाबकामार्गे अस्तित्वात असलेला खंडवा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजसाठी अन्यत्र न वळवता मेळघाटातून जुन्याच मार्गाने नेऊन मेळघाटातील आदिवासींना त्याचा लाभ मिळावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्र्यांकडे के ल्यानंतर या मुद्द्यावरून राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.

वाघांच्या अधिवासाला धोका पोहोचण्याची शक्यता आहे, त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज करण्यात येऊ नये. त्याऐवजी प्रकल्पातून जाणारा अकोला-खंडवा हा प्रस्तावित  ब्रॉडगेज मार्ग इतर पर्यायी भागातून करावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि तत्कालीन केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्राद्वारे केली होती. कायम शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मेळघाटातील रेल्वेच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांना लक्ष्य के ले आहे.

रेल्वे मंत्रालयाने अकोला ते खंडवा अशा १७६ किमी रेल्वे मार्गाला मीटरगेजमधून ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन करण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी मान्यतेसाठी सादर के ला होता. या रेल्वेमार्गाला लागून २३.४८ किमीचे ‘रिअलाइन्मेंट’ही करावे लागणार आहे. त्यामुळे हे रेल्वे मार्गाचे केवळ परिवर्तन राहणार नाही तर मार्गालगतच्या जागेचे पुन्हा आरेखन करावे लागणार आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्याऐवजी बाहेरून इतर पर्यायी मार्गाचे परिवर्तन करायचे ठरविले तर एकीकडे दुर्मीळ अशा वाघांच्या अधिवासाला धक्का लावण्याची गरज भासणार नाही. तसेच जळगाव जामोद आणि संग्रामपूर या तालुक्यांना तसेच आजूबाजूच्या १०० गावांना या नव्या ब्रॉडगेज मार्गाचा फायदा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले होते.

१९७३-७४ मध्ये देशातील जाहीर करण्यात आलेल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांत मेळघाटचा प्रथम क्रमांक लागतो. २७६८.५२ चौ. किमी एवढ्या क्षेत्रावर पसरलेला हा प्रकल्प जागतिकदृष्ट्या प्राधान्याने विकसित प्रकल्पांत मोडतो. प्रस्तावित ब्रॉडगेजमुळे स्वाभाविकच या भागातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे वाहतूक वाढेल परिणामत: प्रकल्पाच्या अगदी गाभ्यातील वन्य प्राण्याच्या अधिवासाला अडथळा येण्याची शक्यता आहे. शिवाय या परिवर्तनामुळे रेल्वेगाड्यांचा वेगही वाढेल. मुळातच हा गाभा अबाधित व सुरक्षित ठेवण्यासाठी येथील १६ गावे आणि या गाभ्याबाहेरील ६ गावे इतर ठिकाणी पुनर्वसित केली आहेत. ही गावे या रेल्वे मार्गाच्या १० किमी परिघातालीच होती. गावांचे पुनर्वसन आणि प्राण्यांच्या अधिवासासाठी प्रयत्न केल्याने येथील वन्यजीव झपाट्याने वाढले. भारतीय वन्यजीव संस्थेनेदेखील या भागातून रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज न करता इतर पर्यायी भागातून करावे, अशी सूचना केली आहे.

पूर्णा-खंडवा हा मीटरगेज रेल्वे मार्ग १९६० च्या दशकात सुरू झाला. राजस्थानमधील जयपूर ते तेलंगणातील काचिगुडा असा जाणारा हा रेल्वेमार्ग राजस्थानमधील जयपूर, अजमेर, चित्तोडगढ, मध्य प्रदेशातील रतलाम, इंदोर, महू आणि खंडवा, महाराष्ट्रातील अकोला, पूर्णा, नांदेड, मुदखेड आणि तेलंगणातील निझामाबाद आणि सिकंदराबाद या शहरांना जोडतो. मेळघाटमधून जाताना या रेल्वेचा वेग संथ असायचा. त्यामुळे या रेल्वे वाहतुकीने वन्यप्राण्यांचे अपघात नगण्य होते. पण, मेळघाटमधील गावांचा या रेल्वेशी असणारा संबंधदेखील कमी होता. मेळघाट मध्ये या रेल्वेचा वापर होण्याऐवजी गैरवापरच अधिक होत असे. मेळघाटमधील मुसळी, अश्वागंधासारख्या वनौषधी, हरिणाची शिंगे, लाकडाच्या मोळ्या अगदी खंडवापर्यंत वाहून नेण्यास अत्यंत सोयीचे वाहन अशी या  रेल्वेची ओळख बनली होती.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पाकडे या सर्व वनगुन्ह्याची यादी  उपलब्ध आहे, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे.

केंद्रीय व्याघ्र प्राधिकरणाने क्षेत्र भेट देण्यासाठी २०१५ मध्ये त्रिसदस्यीय समिती गठित केली होती. या समितीनेसुद्धा मेळघाटच्या गाभा क्षेत्रातून ब्रॉडगेज करण्यापेक्षा गाभा क्षेत्राबाहेरून जाणारे इतर दोन पर्यायी मार्ग वन्यजीव उपाय योजनांसह डिसेंबर २०१७ मध्ये केंद्र शासनास सादर केले. दुसरीकडे, व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून मार्गाचे विस्तारीकरण करण्यास आपला विरोध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी कळविले. हा विस्तारित रेल्वे मार्ग हिवरखेड मार्गे नेल्यास व्याघ्र प्रकल्पाचे नुकसान होणार नाही व जास्तीतजास्त गावांना जोडता येईल अशी भूमिका केंद्रास कळविली आहे. मात्र, खासदार नवनीत राणा यांनी या निर्णयामुळे मेळघाटचे नुकसान होणार असल्याचे सांगितल्याने यावरून राजकारण होत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

मेळघाटातील जुन्या रेल्वे मार्गाऐवजी अन्य मार्गाने अकोला ते खंडवा रेल्वे मार्ग वळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे मेळघाटातील आदिवासींचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे हा रेल्वे मार्ग जैसे थे ठेवून ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करावा. अकोला, अकोट, धूळघाट, डाबकामार्गे अस्तित्वात असलेला खंडवा मीटरगेज रेल्वेमार्ग ब्रॉडगेजसाठी अन्यत्र न वळवता मेळघाटातून जुन्याच मार्गाने नेऊन मेळघाटातील आदिवासींना त्याचा लाभ मिळावा.         – नवनीत राणा, खासदार, अमरावती.

पर्यायी मार्गाने ही रेल्वे अमरावती, अकोला व बुलढाणा या तीन्ही जिल्ह्यांतील कृषी, उद्योग व पर्यटन क्षेत्रासाठी वरदान ठरू शकेल. मग असे असताना मेळघाटच्या कोअर क्षेत्राबाहेरून जाणाऱ्या प्रस्तावित मार्गाला विरोध करण्याचे कारण समजण्या पलीकडचे आहे. यावर एकत्र बसून पर्याय काढण्यापेक्षा आपला हट्ट लावून धरण्यामुळे २०१५ पासून हा प्रकल्प रखडला आहे. दीर्घकालीन व्याघ्र संवर्धनाच्या दृष्टीनेदेखील ते महत्वाचे आहे. जुन्या मार्गावर दरडी कोसळण्याचाही धोका आहेच. – किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ.

......................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments