भूमिगत मार्गाला पर्यावरणप्रेमींचा विरोध

भूमिगत मार्गाला पर्यावरणप्रेमींचा विरोध
‘पर्यावरण आघात मूल्यांकन अभ्यास करा, मगच प्रकल्प मार्गी लावा!’
मुंबई : ठाणे ते बोरिवलीदरम्यान उभारण्यात येणाऱ्या भूमिगत मार्ग प्रकल्पासाठी जमीन संपादनाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता लवकरच हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. मात्र असे असले तरी हा प्रकल्प नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे. नियमानुसार पर्यावरण आघात मूल्यांकन अभ्यासाची गरज या प्रकल्पाला नसल्याचे म्हणत हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) राबविला जात आहे. मात्र हा अभ्यास करणे सर्वच प्रकल्पासाठी आवश्यक असून या प्रकल्पासाठी तो करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. जोपर्यंत या अभ्यासाचा अहवाल सादर होत नाही, तोपर्यंत प्रकल्प मार्गी लावू दिला जाणार नाही, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधील नागरिकांना उभय ठिकाणच्या शहरात झटपट पोहोचता यावे यासाठी एमएमआरडीएने ठाणे-बोरिवलीदरम्यान भूमिगत मार्ग प्रकल्प राबविण्यात निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याआधीच या प्रकल्पाला विरोध होऊ लागला आहे. मुंबई आणि ठाण्यातील पर्यावरणप्रेमींकडून प्रकल्पास विरोध होत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून भूमिगत मार्ग जात असल्याने त्याचा वन्यजीव तसेच येथील तलावाच्या पाण्यावर परिणाम होणार आहे, तर भविष्यात येथून जाणाऱ्या वाहनाची संख्या वाढणार आहे. त्याचाही परिणाम येथील पर्यावरण आणि वन्यजीवांवर होणार आहे. असे असताना याचा अभ्यास न करता हा प्रकल्प राबविण्यास आमचा विरोध असल्याचे वनशक्तीचे प्रकल्प संचालक स्टॅलिन दयानंद यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग अशा ठिकाणांवरून हा मार्ग जात नाही. त्यामुळे नियमानुसार पर्यावरण मूल्यांकन अभ्यासाची गरज नसल्याचे एमएमआरडीएकडून वेळोवेळी स्पष्ट करण्यात आले. त्याच वेळी प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या परवानगीची गरज असून ही परवानगी घेतल्याचे ही एमएमआरडीएमे कागदोपत्री नमूद केले आहे, पण ठाण्यातील पर्यावरणप्रेमी रोहित जोशी यांनी याला आक्षेप घेतला आहे. कोणताही प्रकल्प राबविताना त्याचा पर्यावरण आघात मूल्यांकन अभ्यास होणे गरजेचे आहे. पण या प्रकल्पात याला टाळाटाळ केली जात आहे. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर मोठा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे हा अभ्यास करावा आणि मगच प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींची असल्याचेही त्यांनी सांगितले. हा अभ्यास होत नाही तोपर्यंत प्रकल्प मार्गी लावू दिला जाणार नाही, अशी भूमिका पर्यावरणप्रेमींनी घेतली आहे. तर गरज पडल्यास यासाठी न्यायालयात दाद मागण्यात येईल. त्यामुळे आता यावर राज्य सरकार आणि एमएमआरडीएची भूमिका काय असेल हे महत्त्वाचे ठरणार आहे. याविषयी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे विचारणा केली. पण त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.या प्रकल्पासाठी पर्यावरणविषयक पूर्वपरवानगीची गरज नसल्याचे पर्यावरण मंत्रालयाने कळवले आहे. येत्या काळात पर्यावरणाबाबतच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावण्यात येईल. तर पर्यावरण आघात मूल्यांकन अभ्यासही केला जाईल. – एकनाथ शिंदे, नगरविकासमंत्री आणि अध्यक्ष, एमएमआरडीए
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment