देशी सफरचंद, सीताफळांनी बाजारात गोडवा

देशी सफरचंद, सीताफळांनी बाजारात गोडवा
जास्त आवक, कमी दर; श्रावण महिन्यामुळे चांगली मागणी
ठाणे : परदेशातून आयात झाल्यानंतर शीतगृहाच्या वस्तीला गेलेल्या सफरचंदावर इतके दिवस गुजराण करणाऱ्या मुंबई, ठाणेकरांना गेल्या काही दिवसांपासून अस्सल भारतीय आणि तुलनेने चवीला गोड असलेल्या सफरचंदाचा आस्वाद घेता येत आहे. पावसाळा सुरू झाल्याने फळांच्या घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून हिमाचल प्रदेशातून येणाऱ्या देशी सफरचंदांचा हंगाम सुरू झाला आहे. वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळबाजारात दररोज ४ ते ६ हजार क्विंटल सफरचंद विक्रीसाठी दाखल होत आहेत. त्याचबरोबर पावसाळी हंगामात येणाऱ्या आणि आकाराने मोठय़ा असलेल्या सीताफळांचीही आवक वाढली असून दररोज ५०० ते ६०० क्विंटल सीताफळ फळबाजारात विक्रीसाठी येत आहेत. हंगामातील या दोन्ही फळांची मागणी आता ग्राहकांकडून वाढू लागली आहे.
भारतीय बाजारपेठेत वर्षभर दिसणारे सफरचंद हे प्रामुख्याने न्यूझीलंड, इराण, इटली, अमेरिका या देशांतून येत असतात. परदेशी बनावटीच्या या सफरचंदांची वर्षभर शीतगृहांमध्ये साठवण केली जाते आणि ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांची विक्री केली जाते. परदेशातून येणाऱ्या या फळांचा वाहतूक आणि साठवण खर्च जास्त असल्याने त्यांचे दर किरकोळ बाजारात कायम चढेच असतात. ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर फळबाजारात सिमला हंगामाची फळ म्हणून प्रचलित असलेल्या हिमाचल प्रदेशातील सफरचंदाची मोठी आवक सुरू होते. रिचर्ड, रॉयल गाला, रेड डिलिशियस, रेड गोल्ड या प्रकारातील सफरचंद सध्या बाजारात विक्रीसाठी आले आहेत. सिमल्यातून येणारी ही फळे अधिक ताजी आणि चवीला गोड असतात. परदेशी सफरचंदाच्या तुलनेने या फळाचा वाहतूक आणि साठवण खर्च कमी असल्याने त्यांची विक्रीही कमी दरात होते. यामुळे ग्राहकांकडून भारतीय सफरचंदाला चांगली मागणी असते. दिवाळीपर्यंत या देशी सफरचंदांचा हंगाम सुरू राहतो. सध्या किरकोळ बाजारात हे सफरचंद ९० ते १३० रुपये किलोने विकली जात आहेत तर घाऊक बाजारात २० ते २८ किलोच्या पेटीची विक्री दोन हजार ते तीन हजार रुपयांना केली जात आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
सीताफळाची आवक वाढली
फळबाजारात जुन्नर, सासवड आणि शिरूर येथून येणाऱ्या सीताफळांची आवक वाढली आहे. कमी खर्चात पुरेसे उत्पादन देणारे फळ म्हणून सीताफळ ओळखले जाते. ऑगस्ट महिन्याच्या मध्यानंतर प्रामुख्याने बाळानगरी जातीचे सीताफळ विक्रीसाठी बाजारात दाखल होते. आकाराने मोठे आणि फळात जास्त गर असल्याने यांची ग्राहकांकडून चांगली मागणी असते. सप्टेंबरअखेपर्यंत या जातीच्या सीताफळांची आवक सुरू असते. त्यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात औरंगाबाद, जळगाव, परभणी, नाशिक, सोलापूर या भागांतून येणाऱ्या हनुमान आणि गोल्डन या संकरित जातीच्या सीताफळांची आवक सुरू होते. सध्या विक्रीसाठी दाखल झालेली बाळानगरी जातीची सिताफळे घाऊक बाजारात ३० ते ५० रुपये किलोने तर किरकोळ बाजारात ६० ते ९० रुपये किलोने विकली जात आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
आंब्यानंतर फळबाजारात सफरचंद आणि सीताफळांची चलती असते. चवीला गोड असलेली देशी जातीची सफरचंदे आणि जास्त गर असलेली सीताफळे या हंगामात ग्राहकांना कमी दरात उपलब्ध होतात. श्रावणात ग्राहकांकडून चांगली मागणी असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांकडून उचल होत आहे.
– नितीन चासकर, फळ व्यापारी, वाशी
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा