निर्बंधमुक्तीच्या पहिल्याच दिवशी गजबज


निर्बंधमुक्तीच्या पहिल्याच दिवशी हॉटेल्स गजबजली

निर्बंधमुक्तीच्या पहिल्याच दिवशी गजबज


स्वातंत्र्यदिनी मेट्रो, सोनेगाव तलावाकाठी लोकांची गर्दी


 निर्बंधमुक्तीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे स्वातंत्र्यदिनी शहरातील उपाहारगृहे (रेस्टॉरन्ट) आईस्क्रीम पार्लरमध्ये तरुणाईने गर्दी केली होती. एरवी मोजक्याच प्रवाशांसह धावणाऱ्या मेट्रोत  लससक्तीनंतरही पाय ठेवायला जागा नव्हती. उद्याने, तलावावरही असेच चित्र होते. विशेष म्हणजे, कुठेही नागरिकांच्या चेहऱ्यांवर करोना भय दिसून आले नाही.

मंदिर, जलतरण तलाव, नाटय़गृहे, शाळा, महाविद्यालये, मल्टीप्लेक्सेस व इतर काही बाबी वगळता करोना संसर्ग रोखण्यासाठी लावण्यात आलेले सर्व प्रतिबंध १५ ऑगस्टपासून खुले करण्यात आले आहे. बाजारपेठा, उपाहारगृहे व इतर दुकाने सर्व पूर्वीप्रमाणे रात्री दहापर्यंत सुरू राहणार आहेत. निर्बंधमुक्तीच्या पहिल्या दिवशी स्वातंत्र्यदिनी  रस्त्यावर वर्दळ दिसून आली. विशेषत: उपाहारगृहांमध्ये तरुणाईची गर्दी होती. बर्डी, प्रतापनगर ते माटे चौका दरम्यान असलेली उपाहारगृहेही सांयकाळी फुल्ल झालेली दिसली. शहरालगतच्या महामार्गावरील धाब्यांवर असेच चित्र होते.

प्रतापनगर चौकातील आईसक्रीम पार्लर पूर्वीप्रमाणेच गजबजलेले दिसले. अजनी चौकातील हल्दीरामध्ये मिठाई खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा होत्या. फुटाळा तलाव बंद होता. अंबाझरी तलावावरही दुपारी चापर्यंत पोलीस गस्ती होती. त्यामुळे सोनेगाव तलावावर सायंकाळी नेहमीपेक्षा अधिक गर्दी होती.

मेट्रोने लशींच्या दोन्ही मात्रा घेणाऱ्यांनाच आत प्रवेश देण्याचा ठरवले होते. परंतु, अनेक स्थानकावर लसीकरण पूर्ण न झालेल्यांनाही प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे, काही स्थानकांवर लसीकरणाचे प्रमाणपत्र पडताळणीची तसदीही कुणी घेतली नाही. बर्डी स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती. विशेषत: लहान मुलांना घेऊन त्यांचे पालक मेट्रोतून प्रवास करण्यासाठी आले होते.

लोकमान्यनगर किंवा खापरीकडे जाणारी गाडी बर्डी स्थानकावरच प्रवाशांनी भरून जात होती. एरवी मेट्रोतून प्रवास करा, असे महामेट्रोला नागरिकांना सांगावे लागते. रविवारी गाडय़ांमध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. एअरपोर्ट साऊथ या स्थानकावरून मात्र अनेकांना  लस न घेतल्याने परत जावे लागले.

प्रमाणपत्र पाहूनच तेथे आत

सोडले जात होते. मात्र इतर स्थानकांवर असे चित्र नव्हते. प्रमाणपत्र न पाहताच प्रवाशांना सोडले जात होते.  गाडीत मेट्रोचा सुरक्षा रक्षक प्रवाशांना मुखपट्टी लावण्यासाठी आवाहन करीत होता. स्वातंत्रदिनी महामेट्रोतून किती प्रवाशांनी प्रवास केला याबाबत महामेट्रोचे जनसंपर्क अधिकारी यांना विचारले असता याबाबत त्यांनी काही सांगण्यास नकार दिला.

मॉल प्रवेशासाठी वयाचा दाखला अनिवार्य

१८ वर्षांखालील मुलांसाठी लसीकरण सुरू न झाल्याने या वयोगटातील मुलामुलींना मॉलमध्ये प्रवेश करताना त्यांच्या वयाचा पुरावा असलेले कागदपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड,शाळा-महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा तत्सम) प्रवेशद्वारावर दाखवणे अनिवार्य आहे, सोमवारी यासंदर्भात राज्य शासनाने सुधारित आदेश काढला आहे.

‘सारंग’ फाऊंडेशनचा उपक्रम

स्वातंत्र्यदिनी रस्त्यावर पडलेले कागदी व प्लास्टिकचे राष्ट्रध्वज सारंग फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी गोळा केले. दरवर्षी फाऊंडेशनचे अध्यक्ष सारंग ढोक यांच्या सहकाऱ्यांकडून हा उपक्रम राबवला जातो. स्वातंत्र्यदिनी लहान मुले व इतरही नागरिक कागदी व प्लास्टिकचे ध्वज कुठेही टाकून देतात. त्यांचा अवमान होऊ नये, यासाठी फाऊंडेशनचे कार्यकर्ते ते गोळा करतात.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments