विकास कामात अडथळे येऊ देणार नाही!


विकास कामात अडथळे येऊ देणार नाही!

विकास कामात अडथळे येऊ देणार नाही!

नितीन गडकरी यांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांचे जाहीर उत्तर


नागपूर : वाशीम जिल्ह्य़ातील महामार्गाच्या कामात स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमुळे अडथळे येत आहेत, अशी तक्रार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली होती. या पत्राला शुक्रवारी जाहीर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, मेट्रोप्रमाणेच राज्याचा विकासाचा प्रवासही जलदगतीने व्हावा अशीच आपली इच्छा आहे. त्यात कोणतेही अडथळे येऊ देणार नाही.

महामेट्रोच्या नागपुरातील बर्डी ते कस्तुरचंद पार्क या १.६ किलोमीटर मार्गिकेचे व त्यावरील झिरोमाइल फ्रीडम पार्क स्थानकाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री मुंबईहून आभासी पद्धतीने सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील इतर मंत्रीही यावेळी उपस्थित होते.

गडकरी यांच्या पत्राची राज्यभर चर्चा झाल्यानंतर प्रथमच या कार्यक्रमात दोन्ही नेते सहभागी होणार असल्याने या पत्राचा उल्लेख मुख्यमंत्री करतील, असा अंदाज होता. ठाकरे यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवातच ‘मेरे प्रिय मित्र नितीनजी, आप बोलते अच्छे हो और पत्र भी लिखते हो’ अशी करून पत्राच्या विषयाला हात घातला. आपण दोघेही कर्तव्यकठोर आहोत. विकासाच्या कामात अडचणी येऊ द्यायच्या नाही, अशी शिकवण तुम्हाला (गडकरी) आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मिळाली आहे. त्यामुळे प्रवास मेट्रोच्या कामाचा असो किंवा राज्याच्या विकासाचा त्यात कुठलाही अडथळा येऊ देणार नाही, अशी ग्वाही ठाकरे यांनी गडकरी यांना दिली.

नागपूरच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेतून निधी द्यावा, अशी विनंती गडकरी यांनी त्यांच्या भाषणात केली होती. त्याचीही दखल ठाकरे यांनी घेतली. तुम्ही केलेल्या सूचना दृष्टिआड केल्या जाणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

‘लोकप्रिय मुख्यमंत्री’ – गडकरी

तत्पूर्वी नितीन गडकरी यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्र्यांचा उल्लेख ‘लोकप्रिय मुख्यमंत्री’ असा करत त्यांच्या कामाचे कौतुक केले व केंद्रात मंत्रिपदी राहून महाराष्ट्राचा जास्तीत जास्त विकास कसा करता येईल, यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी दिल्लीहून आभासी पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org