देशात कायदे मंजुरीबाबत खेदजनक स्थिती!


देशात कायदे मंजुरीबाबत खेदजनक स्थिती!

देशात कायदे मंजुरीबाबत खेदजनक स्थिती!


सरन्यायाधीशांचे प्रतिपादन; संसदेत चर्चेच्या अभावामुळे क्लिष्टता, संदिग्धता


नवी दिल्ली : सरन्यायाधीश एन. व्ही. रमण यांनी रविवारी कायदे मंजूर करण्याच्या प्रक्रियेबाबत देशात खेदजनक स्थिती असल्याचे भाष्य करीत संसदेतील चर्चेच्या अभावावर बोट ठेवले.

संसदेत मांडलेल्या विधेयकांवर योग्य प्रकारे चर्चा होत नसल्याने कायद्यांमध्ये क्लिष्टता आणि संदिग्धता राहते, परिणामी खटल्यांचे प्रमाण वाढते, सरकारचे नुकसान होते आणि नागरिकांची गैरसोय होते. कायदा करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सविस्तर चर्चा केल्यामुळे खटल्यांचे प्रमाण कमी होते, असे सरन्यायाधीश रमण म्हणाले. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने (एससीबीए) आयोजित केलेल्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सरन्यायाधीश बोलत होते.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनातील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी केलेल्या टिप्पण्या महत्त्वाच्या आहेत. विरोधकांनी पेगॅसस पाळत प्रकरण, नवी कृषी कायदे महागाई इत्यादी विषय लावून धरल्याने झालेल्या गोंधळात अनेक विधेयक चर्चेविना मंजूर झाली. गोंधळामुळे संसदेचे कामकाजही अनेकदा संस्थगित करण्यात आले.

न्या. रमण म्हणाले की, देशाच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढय़ाचे नेतृत्व वकिलांनी केले. महात्मा गांधी असोत किंवा बाबू राजेंद्र प्रसाद, ते कायदेतज्ज्ञ होते. त्यांनी आपली संपत्ती, कुटुंबाचा त्याग केला आणि चळवळीचे नेतृत्व केले. पहिल्या लोकसभा आणि राज्यसभेचे बहुतेक सदस्य वकील आणि कायद्याशी संबंधित होते. दुर्दैवाने, सध्या संसदेत कायद्यांवरील चर्चेच्या बाबतीत काय घडते आहे, हे आपल्याला माहीतच आहे.

मी पूर्वी औद्योगिक तंटय़ांबाबतच्या अधिनियमावरील एक चर्चा ऐकली होती. तमिळनाडूमधील एक सदस्य कायद्याची विस्तृत चर्चा करायचे. संबंधित कायद्याचा कामगार वर्गावर कसा परिणाम होईल, याचे ते विश्लेषण करीत असत. अशा चर्चेमुळे कायद्याचा अर्थ लावताना न्यायालयांवरील भार कमी होतो, असेही सरन्यायाधीशांनी नमूद केले.

सरन्यायाधीश म्हणाले..

’संसदेत कायद्यावरील चर्चेच्या बाबतीत आता खेदजनक स्थिती.

’वादविवादाच्या अभावामुळे कायद्यात संदिग्धता आणि क्लिष्टता राहते.

’कायदे करण्याच्या प्रक्रियेदरम्यान सविस्तर चर्चा केल्यामुळे खटल्यांचे प्रमाण कमी होते.

’कायदे कोणत्या उद्देशाने हे माहिती नसल्यामुळे नागरिकांचीही गैरसोय होते.

वकिलांना सल्ला..

वकिलांना मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश म्हणाले, ‘‘पैसा कमवा, आरामात राहा, आपला व्यवसाय भला की आपण असा मर्यादित विचार करू नका. आपण सार्वजनिक जीवनात सक्रियपणे भाग घेतला पाहिजे. काही चांगले काम केले पाहिजे आणि आपला अनुभव इतरांनाही कथन केला पाहिजे. त्यातून काही चांगले निष्पन्न होईल, अशी आशा आहे.

पूर्वीच्या काळी संसदेच्या सभागृहांमध्ये वादविवाद, चर्चा होत असे. ती विधायक आणि ज्ञानवर्धक असे. आता मात्र खेदजनक स्थिती आहे.

– न्या. एन. व्ही. रमण, देशाचे सरन्यायाधीश

.....................................
------------------------------

www.freshnewz.in


Comments