सायबर फसवणूक रोखण्यास त्वरित तक्रार महत्त्वाची

सायबर फसवणूक रोखण्यास त्वरित तक्रार महत्त्वाची
अडीच वर्षांत २३ कोटी २० लाखांची रक्कम परत मिळवण्यात यश
पुणे : सायबर चोरटय़ांकडून फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ज्या तक्रारदारांनी त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. अशा नागरिकांची फसवणूक रोखण्यात यश आले आहे. या पाश्र्वभूमीवर सायबर गुन्हा घडल्यास नागरिकांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर पोलीस ठाण्याकडून विशेष दूरध्वनी सुविधा सुरू करण्यात आली आहे. तक्रारदाराच्या खात्यातील रक्कम चोरटे दुसऱ्या खात्यात वर्ग करण्यापूर्वी सायबर पोलिसांनी त्वरित तक्रारादाराचे ज्या बँके त खाते आहे, तेथील अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधून चोरटय़ांच्या खात्यात वळते होत असलेली रक्कम परत मिळवली आहे. गेल्या अडीच वर्षांत पोलिसांनी २३ कोटी २० लाख ६३ हजारांची रक्कम मिळवली आहे तसेच सायबर गुन्ह्य़ातील ६० लाखांची रक्कम चोरटय़ांकडून जप्त करण्यात आली आहे. सायबर गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत असून सायबर चोरटे नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारची आमिषे दाखवून गंडा घालत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले असले तरी नागरिक आमिषांच्या जाळ्यात सापडत आहेत. ऑनलाइन फसवणूक झाल्यास तक्रारदारांनी अशा प्रकारांची माहिती त्वरित (गोल्डन अवर) सायबर पोलीस ठाण्यात देणे गरजेचे असते. सायबर चोरटे ऑनलाइन खरेदी तसेच व्यवहारात तक्रारदाराची गोपनीय माहिती घेऊन ऑनलाइन पद्धतीने रोकड लांबवितात. अशा परिस्थितीत अनेक नागरिकांना तक्रार कोठे आणि कशी करायची, याची माहिती देखील नसते. सायबर पोलिसांच्या हेल्पलाइनवर तक्रार केल्यास त्वरित चोरटय़ांच्या खात्यात वळविली गेलेली रक्कम किंवा व्यवहार थांबविण्यासाठी संबंधित बँकेकडे तक्रार करता येणे शक्य होते. चोरटय़ाने एखादा व्यवहार केल्यास त्वरित त्याचे स्क्रीनशॉट, संदेश, बँकेचे नाव, खाते क्रमांक, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड क्रमांक, लिंक मोबाइल क्रमांक याबाबतची माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठविल्यास किंवा स्क्रीनशॉट पाठविल्यास ज्या खात्यातून पैसे काढण्यात आले असतील, त्या बँकेबरोबर संपर्क साधण्यात येतो. तसेच चोरटय़ाने ज्या बँकेच्या खात्यात पैसे वळवले असतील, त्या बँकेच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती देणे शक्य होते. त्यामुळे सायबर चोरटय़ाने के लेल्या फसवणुकीला वेळीच आळा घालणे शक्य होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलिसांचे आवाहन
शक्यतो मोबाइल क्लोन अॅप डाऊनलोड करू नका. अनधिकृत लिंक उघडू नका. मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डची माहिती देऊ नका. ऑनलाइन फसवणूक झाल्यानंतर त्वरित सायबर पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा. एखाद्या व्यवहारात नागरिक एखाद्या कंपनीच्या तक्रार निवारण केंद्राशी (कस्टमर केअर सेंटर) संपर्क साधतात. बऱ्याचदा चोरटे तक्रार निवारण केंद्राच्या क्रमांकाचा दुरुपयोग करतात. त्यांनी केलेल्या तांत्रिक बदलामुळे तक्रारदाराचा क्रमांक त्यांना उपलब्ध होतो. त्याचा वापर ते फसवणुकीसाठी करतात.
सायबर पोलीस हेल्पलाइन
व्हॉट्सअॅप क्रमांक- ७०५८७१९३७१ किंवा ७०५८७१९३७५
सायबर पोलीस ठाणे- ०२०-२९७१००९७ इमेल- crimecyber.pune@nic.in
www.freshnewz.in
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment