ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ


ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ

ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ


हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम


ठाणे: ठाणे जिल्ह्य़ात करोना रुग्णांची संख्या एकीकडे घटली असली तरी गेल्या काही दिवसांपासून हवामानात होत असलेल्या बदलाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर दिसू लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आणि डोकेदुखीचा त्रास होत असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील उपकेंद्रे तसेच खासगी दवाखान्यांत मागील काही दिवसांपासून या रुग्णांमध्ये २५ ते ३० टक्क्य़ांनी वाढ झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली असून उन्हाचे चटके बसण्यास सुरुवात झाली आहे. या बदलत्या वातावरणाच आरोग्यावर परिणाम होऊ लागल्यामुळे साथीचे आजार पसरण्यात वाढ होऊ लागली आहे. ताप, सर्दी, खोकला, डोकेदुखी अशी विविध कारणे घेऊन रुग्ण जिल्ह्य़ातील उपकेंद्र तसेच खासगी दवाखान्यांत गर्दी करू लागले आहेत. डेंग्यू आणि मलेरिया साथीच्या रुग्णांचे प्रमाणही या कालावधीत वाढलेले आहे, अशी माहिती ठाण्यातील कोपरी येथील खासगी डॉक्टर नंदकुमार ठाकूर यांनी दिली.

ठाणे जिल्ह्य़ात जुलै महिन्यात ८२ मलेरियाचे तर चार डेंग्यूचे रुग्ण आढळून आले असल्याची नोंद जिल्हा आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. जिल्ह्य़ात सद्य:स्थितीला १२० ते २०० करोना रुग्ण आढळून येत आहेत. मागील काही दिवसांपासून पाऊस थांबला

असून उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. या वातावरणात झालेला बदल आणि प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठय़ा प्रमाणात परिणाम होऊ लागला आहे. यामुळे आजाराची लक्षणे कळताच नागरिकांनी जवळच्या उपकेंद्र किंवा खासगी दवाखान्यात जाऊन औषधोपचार घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात येत आहे.

पालिकेकडून सर्वेक्षण

कल्याण-डोंबिवली शहरात पालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी करोना महासाथ सुरू असल्याने १५ नागरी आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून घरोघरचे साथ आजाराची माहिती घेणारे सर्वेक्षण सुरू केले आहे. ताप, सर्दी, खोकला अशा प्रकारचे आजार असतील तर तात्काळ जवळच्या पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात किंवा आपल्या डॉक्टरकडे जाण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांकडून रहिवाशांना देण्यात येत आहेत.

सध्या करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी वातावरण बदलामुळे ताप, सर्दी, खोकला या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अशा वेळी नागरिकांनी जवळच्या उपकेंद्रात किंवा खासगी दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजारात दिवसेंदिवस वाढ होत असल्यास करोना चाचणी केंद्रावर जाऊन चाचणी करून घ्यावी.

– डॉ. अशोक कांबळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय.

ताप, सर्दी, खोकला झाल्यास हा आजार सामान्य आहे असे न समजता तात्काळ रहिवाशांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात जावे. घरगुती उपचारांना प्राधान्य द़ेऊ नये. अशा आजारात लहान मुलांची सर्वाधिक काळजी घ्यावी. करोना चाचणी तात्काळ करून घ्यावी. अंगावर काढलेला आजार नंतर त्रासदायक ठरू शकतो याची जाणीव प्रत्येक रहिवाशाने ठेवावी.

-डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org