Posted by
MANGOCITY FRESH NEWS
मुंबई पोलिस दलाच्या श्वानपथकामध्ये साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलांची नेमणूक
मुंबई पोलिस दलाच्या श्वानपथकामध्ये साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिलांची नेमणूक
मुंबई: मुंबई पोलिस दलाच्या श्वानपथकाचे यंदाचे हीरक महोत्सवी वर्ष असून, साठ वर्षांच्या इतिहासात प्रथमच या पथकामध्ये महिलांची नेमणूक केली जाणार आहे. मुंबई पोलिस दलातील १२ महिलांची 'डॉग हँडलर्स' (श्वानांचा सांभाळ करणारे) म्हणून निवड करण्यात आली आहे. छोट्या श्वानांसोबत या महिला पोलिसांना प्रशिक्षण देऊन त्यांची नियुक्ती वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे.मुंबई सदैव दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असते. व्हीआयपींचे दौरे कायम सुरू असतात, तसेच विविध प्रकारच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी मुंबई पोलिसांचे श्वान महत्त्वाची भूमिका बजावतात. श्वान पथकाचे महत्त्व लक्षात घेता यातील श्वान आणि 'डॉग हँडलर्स'ची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून या श्वान पथकामध्ये महिला 'डॉग हँडलर्स'ची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी इच्छुक असलेल्या महिला पोलिसांची यादी तयार करण्यात आली. या यादीतून प्राथमिक छाननी करून १२ महिला पोलिसांची निवड करण्यात आली आहे. संरक्षण शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत कदम यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 'सर्वच क्षेत्रात महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. 'डॉग हँडलर्स' म्हणूनही त्या चांगली कामगिरी करतील अशी आम्हाला खात्री आहे', असे कदम म्हणाले. मुंबई पोलिस दलात तीन वेगवेगळी श्वान पथके आहेत. गुन्हे शाखेसाठी एक स्वतंत्र श्वान पथक असून व्हीआयपी दौरे, सभा यासाठी गोरेगाव येथे स्वतंत्र श्वानपथक आहे. याशिवाय दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट यासाठी प्रशिक्षित केलेले बॉम्बशोधक आणि नाशक पथक आहे. या प्रत्येक पथकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गरजेनुसार महिला 'डॉग हँडलर्स'ची या पथकांमध्ये नेमणूक करण्यात येणार आहे
हीरकमहोत्सवी वर्ष
सन १९५९मध्ये मुंबई पोलिसांत कुमार, बिंदू आणि राजा हे तीन श्वान सहभागी झाले. डॉबरमन पिन्सर क्लब ऑफ इंडियाच्या वतीने मुंबई पोलिसांना हे श्वान बारियाच्या महाराज्यांच्या हस्ते देण्यात आले होते.
पथकांची सद्यस्थिती
बॉम्ब शोधक व नाशक पथक : बॉम्ब शोधक आणि नाशक पथकात १२ श्वान आणि २४ 'डॉग हँडलर्स' आहेत. त्यापैकी नऊ श्वान सद्यस्थितीत कार्यरत असून, तीन श्वान आणि त्यांचे सहा 'हँडलर्स' पुणे येथे प्रशिक्षण घेत आहेत. श्वान पथक, गुन्हे शाखा : गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आवश्यक असलेल्या या श्वान पथकामध्ये तीन श्वान असून सहा 'डॉग हँडलर्स' आहेत.
.....................................
------------------------------
freshnewsindia24@gmail.com
fresh@freshnewz.in
.......................................
भारत सरकार मान्यता नोंदणी क्रमांक
RNI- MAHMAR/2011/39536
....................................... .
फ्रेश न्यूज टीम ला आजच जॉइन व्हा!महाराष्ट्रभर पत्रकार पाहिजेत!
बातम्या मिळवण्यासाठी व पत्रकार होण्यासाठी कॉल करा : 8448440256
Comments
Post a Comment