भाज्यांचे दर गडगडले


भाज्यांचे दर गडगडले

भाज्यांचे दर गडगडले

मागणीपेक्षाही येणाऱ्या भाज्या अधिक असल्याने भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बहुतांशी भाज्यांचा दर प्रतिकिलो १५ रुपये

मुंबई : राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या भाज्यांची आवक वाढल्याने भाज्यांचे दर गडगडले आहेत. बहुतांशी भाज्यांचे दर प्रतिकिलो १५ रुपये आणि त्याहून खाली घसरल्याची माहिती वाशीतील घाऊक भाजी मंडईतील व्यापाऱ्यांनी दिली. हवामान बदलामुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अपेक्षापेक्षा अधिक पीक आल्याने आवक वाढली आहे. मागणीपेक्षाही येणाऱ्या भाज्या अधिक असल्याने भाव कमी झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

महापुरानंतर पिकांचे नुकसान झाल्याने काही दिवसांत भाज्यांचे दर वाढतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला होता; परंतु हवामान बदलामुळे काही जिल्ह्यांत भाज्यांचे भरघोस पीक आले. ‘पुरेसा पाऊस झाला तर मुबलक भाज्या येतात; पण यंदा सुरुवातीला भरपूर पाऊस झाला. आता तो पूर्ण थांबला असून ऊन व ढगाळ वातावरण या बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम होऊन उत्पादन गरजेपेक्षा जास्त आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईला लागणाऱ्या दैनंदिन गरजेपेक्षा आवक अधिक आहे,’ अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

भाज्यांचे दर घसरल्याने बाजाराचे मोठे नुकसान झाले. मागणीपेक्षा आवक वाढल्याने १० ते १५ टक्के भाज्या फेकून द्याव्या लागत आहेत. वीस रुपये जुडीने मिळणाऱ्या पालेभाज्या ३ ते ५ रुपये जुडीने मिळत आहेत. मेथी आणि कोथिंबिरीला सर्वाधिक फटका बसला आहे. – शंकर पिंगळे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी

सध्या बाजारात गरजेपेक्षा जास्त भाज्या येत असल्याने उरलेल्या भाज्या कचऱ्यात टाकण्याची वेळ आली आहे. या हंगामात पाच रुपये किलोने भाजी विकली जाईल याचा आम्ही विचारही केला नव्हता. फक्त चांगल्या दर्जाच्या भाज्या १५ रुपये प्रतिकिलोने विकल्या जात आहेत. अन्यथा ६ ते ८ रुपये प्रतिकिलोचा भाव सुरू आहे, तरीही कित्येक भागांमधून येणाऱ्या भाज्या आम्ही नाकारल्या आहेत. भाज्यांचे दर उतरल्याने वाशी बाजारात मंदीचे वातावरण आहे. – विजय चव्हाण, व्यापारी, वाशी भाजी मंडई    

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments