सद्यस्थितीत राजकीय कार्यक्रम नकोच – आरोग्यमंत्री


Rajesh-Tope-4

सद्यस्थितीत राजकीय कार्यक्रम नकोच – आरोग्यमंत्री


पिंपरी : करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, सद्यस्थितीत राजकीय कार्यक्रम होऊ नयेत. कोणत्याही परिस्थितीत गर्दी टाळलीच पाहिजे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारी भोसरीत सांगितले. धार्मिक स्थळांचे महत्त्व आहेच, त्याविषयी कोणाचेही दुमत नाही. मात्र, करोनाचा धोका लक्षात घेऊन प्रत्येक गोष्टींकडे जागरूकतेने पाहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

भोसरी एमआयडीसीतील एका खासगी कंपनीला आरोग्यमंत्र्यांनी गुरुवारी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आपण ‘वेट अँड वॉच’ च्या भूमिकेत आहोत. मॉलमध्ये दोन मात्रा घेणाऱ्यांना प्रवेश देण्याचे सरकारचे धोरण आहे. सर्वच मॉल सुरू व्हावेत, ही सरकारची भूमिका आहे. त्या दृष्टीने अधिकाधिक लसीकरण झाले पाहिजे. २५ टक्के लस खासगी रुग्णालयांना मिळते. मॉलचालकांनी अधिकाधिक लसीकरण करून घ्यावे. मॉलच्या कर्मचाऱ्यांना प्राधान्याने लस देता येईल का, याचाही विचार शासनस्तरावर सुरू आहे.

टोपे म्हणाले, १४ ऑगस्टला एका दिवसात साडेनऊ लाख नागरिकांचे लसीकरण आपण करू शकलो. कारण, राज्याची आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. मात्र, लस उपलब्ध न झाल्यास नाइलाज असतो. लस मिळताच वाटपाचे धोरण ठरलेले आहे. एखाद्या भागात लस उपलब्ध होत नाही. त्याचे कारण वरून आम्हाला पुरवठा होत नाही. लसीकरणानंतरही संसर्ग होऊ शकतो. मात्र, त्याची तीव्रता कमी असेल. मृत्युदर कमी झालेला दिसेल. ज्या देशांमध्ये मोठय़ा प्रमाणात लसीकरण झाले आहे, त्या ठिकाणी करोनाच्या तिसऱ्या लाटेतही आजाराची तीव्रता आणि मृत्यूचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. आपणही लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे. त्या दृष्टीने अधिक प्रमाणात लसपुरवठा होण्याची गरज आहे. सामान्यांची लूट करणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी, आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

‘अहवाल प्राप्त झाल्यानंतर शाळा, महाविद्यालयांचा निर्णय’

अधिकाधिक निर्बंध शिथिल करण्याची शासनाची भूमिका आहे. शाळा, महाविद्यालयांच्या बाबतीत दोन्ही विभागांनी, मंत्र्यांनी निर्णय घ्यायचा आहे. कृतिदल, विद्यापीठांचे कुलगुरू, संचालक यांची समिती केलेली आहे. त्या-त्या क्षेत्रीय समित्यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून अहवाल तयार करून संबंधित मंत्रालयाला तो द्यायचा आहे. पाच-सहा दिवसांत अहवाल प्राप्त होतील, त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org