पाचशेहून अधिक महिला अधिकाऱ्यांच्या छळाच्या तक्रारी!


पाचशेहून अधिक महिला अधिकाऱ्यांच्या छळाच्या तक्रारी!

पाचशेहून अधिक महिला अधिकाऱ्यांच्या छळाच्या तक्रारी!


महाराष्ट्र: पारनेरप्रमाणेच महाराष्ट्रातील महिला अधिकारीही सुरक्षित नाहीत. सुमारे ५०० हून अधिक महिला अधिकाऱ्यांनी आपल्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. पारनेरमधील सत्ताधारी आमदाराची दहशत म्हणजे सरकारी यंत्रणा सत्ताधारी पक्षाच्या दावणीला बांधल्यासारखी अवस्था असल्याचा हल्लाबोल भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचामुळे आत्महत्या करावीशी वाटते, असे सूतोवाच करणारी ध्वनिफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली आहे. या पार्श्वभूमीवर वाघ यांनी मंगळवारी पारनेरमध्ये जाऊन देवरे यांची तसेच नगरमध्ये जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत माहिती घेतली. या वेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

तहसीलदार देवरे या महसूल विभागाच्या आहेत, परंतु महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याबद्दल बोलायला तयार नाहीत. नुकतेच रक्षाबंधन झाले, मुख्यमंत्री या निमित्ताने महिला अधिकाऱ्याला दिलासा देतील असे वाटले होते. परंतु तसे घडले नाही. महिला अधिकारी असुरक्षित आहेत. याचा जाब आपण थोरात यांची भेट घेऊन विचारू तसेच देवरे यांचा कशा पद्धतीने छळ सुरू आहे, याची माहिती देऊ असेही वाघ यांनी सांगितले.

नीलेश लंके यांची दहशत

पारनेरचे आमदार नीलेश लंके सर्वांसमक्ष महिला अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात, धमकी देतात. इतर अधिकाऱ्यांनाही मारहाण करतात. परंतु त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जात नाही. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांबाबतच या घटना वारंवार कशा घडत आहेत? देवरे यांची काही चूक असेल तर त्याबद्दल चौकशी करण्यास महसूल विभाग, वरिष्ठ अधिकारी सक्षम आहेत. परंतु त्यांचा छळ करण्याचा, शिवीगाळ करण्याचा अधिकार लंके यांना कोणी दिला, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

वरिष्ठ अधिकारी तहसीलदार देवरे यांना, लोकप्रतिनिधींचे ऐकले नाही तर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होईल, अशी भीती दाखवतात. अशा वातावरणात महिला अधिकारी कशा सुरक्षितपणे काम करू शकतील? घटनेनंतर राज्य सरकारने अद्याप याची दखल घेतली नाही. याचे कारण म्हणजे सत्ताधारी पक्षांना सत्ता आणि पैशाचा माज चढला आहे. महिला सक्षमीकरणाचा नारा देणारे पक्षच महिला अधिकाऱ्यांना त्रास देत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात  घडणारी ही दुर्दैवी घटना असल्याचे प्रतिपादन चित्रा वाघ यांनी केले.

....................................
------------------------------

www.freshnewz.in

टिप्पण्या

news.mangocity.org