पुण्याच्या बापलेकीनं सर केलं आफ्रिकेमधील सर्वात मोठं शिखर; २० दिवसांमधील दुसरी मोठी मोहीम यशस्वी


mount kilimanjaro

पुण्याच्या बापलेकीनं सर केलं आफ्रिकेमधील सर्वात मोठं शिखर; २० दिवसांमधील दुसरी मोठी मोहीम यशस्वी

पुणे: रशियामधील माउंट एलब्रुस शिखर सर करणाऱ्या मराठमोळ्या धनाजी लांडगे आणि गिरीजा लांडगे या बाप लेकीच्या जोडीने आणखी एक शिखर सर करण्याचा पराक्रम केलाय. आफ्रिका खंडातील एकमेव शिखर असलेल्या माउंट किलीमांजारोची उंची ६ हजार ८९५ मीटर ऐवढी आहे. बारा वर्षीय गिरीजा आणि तिचे वडील धनाजी यांनी या शिखरावर यशस्वीरित्या चढाई केलीय. या कामगिरीसाठी पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

आफ्रिका खंडातील पर्वतरांगांचा भाग नसलेला माउंट किलीमांजारो हे आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आहे. नुकतेच या दोघांनी रशियातील माउंट एलब्रूस शिखर सर केलं होतं. या मोहिमेनंतर नवीन आव्हान स्वीकारत धनाजी आणि गिरीजाने अथक परिश्रम घेत हे शिखर सर करण्याचा किर्तीमान स्थापीत केला आहे.

“या मोहिमेची सुरुवात ११ ऑगस्टपासून केली होती. मोहिमेदरम्यान १७०० मीटर, २७०० मीटर, ३७२० मीटर, ४७०० मीटर अशी टप्प्याटप्प्याने ४ दिवसात उंची गाठण्यात आली,” असं धनाजी यांनी सांगितलं आहे. या चढाईदरम्यान रोज नवीन प्रदेश व नवीन वातावरणाचा सामना करावा लागत होता. पहिल्या दिवशी पावसाळी जंगल आणि पाऊस, दुसऱ्या दिवशी मुरलॅण्ड म्हणजेच खडकाळ असा भूभाग व दमट हवामानाचा सामना करावा लागला. तर तिसऱ्या दिवशी वाळवंट सदृश प्रदेश अन् ऊन्हाळी वातावरणाचा सामना करावा लागला. या सर्व परिस्थितींशी दोन हात करत १५ ऑगस्टच्या पहाटे १ वाजता शिखर माथ्याच्या मुख्य चढाईला म्हणजेच ४७०० मीटर वरून ५८९५ मीटरच्या चढाईला सुरुवात करण्यात आल्याचं धनाजी म्हणाले.

“रात्रभर उणे १५ अंश ते २० अंश असणाऱ्या थंड वातावरणात चढाई सुरू होती. प्रथम गिलमन्स पॉईंट्सनंतर स्टेला पिक अन् मग सर्वोच्च असणारा शिखर माथा म्हणजेच माउंट किलीमांजारो सर करण्यास आम्हाला यश आले. वातावरणाची आक्रमकता व वाहणाऱ्या थंड वाऱ्यांशी सामना करत हे शिखर सर करण्यासाठी साडेआठ तास लागले,” असं लांडगे म्हणाले. माथ्यावर पोहचल्यानंतर या बापलेकीने आफ्रिकेतील सर्वोच्च ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनरही झळकावलं.

सेव्हन समिटपैकी माउंट एल्ब्रुस आणि माउंट किलीमांजारो ही दोन्ही शिखरे अवघ्या २० दिवसामध्ये यशस्वीरित्या सर करणारी गिरिजा लांडगे ही जगातली पहिली मुलगी ठरल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, हा पराक्रम करणारी ही बापलेकीची पहिलीच जोडी आहे असंही म्हणावं लागेल. मुलगा मुलगी भेदभाव न करता मुलींना खंबीर पाठींबा दिला तर मुलगी जगाच्या पाठीवर कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकते हे गिरीजाने साध्य करून दाखवल आहे, असंही धनाजी लांडगे यांनी आपल्या मुलीच्या कामगिरीबद्दल बोलताना म्हटलं आहे.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments