एचआयव्ही बाधितांच्या निदानात निम्म्याहून अधिक घट

 


एचआयव्ही बाधितांच्या निदानात निम्म्याहून अधिक घट

एचआयव्ही बाधितांच्या निदानात निम्म्याहून अधिक घट

मुंबईत २०१८-१९ या काळात चार लाख ६८ हजार चाचण्या केल्या गेल्या असून यातून ४,९६४ रुग्णांचे निदान नव्याने झाले होते.


मुंबई : करोना साथीच्या उद्रेकाचा परिणाम मुंबईतील एचआयव्ही बाधितांच्या निदानावरही झाला असून गेल्या वर्षभरात या रुग्णांच्या निदानाचे प्रमाण जवळपास निम्म्याहूनही कमी झाले आहे. तसेच अ‍ॅन्टीरेट्रोव्हायरल (एरआरटी) सेंटरवर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही काही अंशी कमी झाल्याचे दिसून येते.

राज्यात करोना साथीचा हाहाकार उडाल्यानंतर सर्व आरोग्य व्यवस्था करोनाकेंद्री झाल्याचा फटका इतर आरोग्य सेवांना बसला आहे. यात एचआयव्ही बाधितांचाही समावेश असून मुंबईत एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात एचआयव्हीच्या चाचण्या आणि नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

मुंबईत २०१८-१९ या काळात चार लाख ६८ हजार चाचण्या केल्या गेल्या असून यातून ४,९६४ रुग्णांचे निदान नव्याने झाले होते. २०१९-२० काळात चाचण्यांच्या संख्येत वाढ होत चार लाख ७३ हजार चाचण्या केल्या गेल्या. परंतु त्या तुलनेत नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मात्र घट झाली असून ४,४७३ रुग्ण आढळले. एप्रिल २०२० ते   मार्च २०२१ या काळात मात्र चाचण्यांची संख्या थेट सुमारे दोन लाख ६३ हजारापर्यंत कमी झाली. परिणामी, नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली असून ही संख्या २,०६३ पर्यंत घटली आहे.

‘मुंबईत मोठ्या प्रमाणात एचआयव्ही बाधितांचे निदान हे इतर उपचारांसाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णांमधून होते. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव शहरात मार्च २०२० पासून सुरू झाला. यानंतर खासगी आरोग्य सेवा बंद झाल्या. सरकारी रुग्णालयांचे मोठ्या प्रमाणात करोना रुग्णालयात रूपांतर झाले. त्यामुळे येथे इतर उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली. तसेच टाळेबंदीमुळेही रुग्ण रुग्णालयात पोहचू शकले नाहीत. त्यामुळे चाचण्यांची संख्या कमी झाली. याचा परिणाम नव्याने निदान होणाऱ्या बाधितांच्या संख्येवर झाला आहे’, असे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्या प्रकल्प प्रमुख डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले.

करोना काळात एचआयव्हीबाधितांसाठी असलेली इंटिग्रेटेड काऊन्सिलिंग अ‍ॅण्ड टेस्टिंग सेंटर (आयसीटीसी) पूर्णपणे खुली होती. येथे चाचण्यांवर आम्ही भर दिला. परंतु टाळेबंदीमुळे येथेही येणाऱ्यांची संख्या तुलनेने कमी होती. आता सर्व नियमित होऊ लागल्यामुळे रुग्णांची रुग्णालयातील वर्दळ वाढत आहे. त्यामुळे पुन्हा चाचण्याची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे मत आचार्य यांनी व्यक्त केले

उपचारावर असलेल्या रुग्णांच्या संख्येतही घट

मुंबईत २०१८-१९ मध्ये ३८,२५४ रुग्ण एआरटी सेंटरवरून उपचार घेत होते. २०१९-२० मध्ये यात वाढ होऊन ही संख्या ३९,५०९ झाली. २०२०-२१ मध्ये मात्र यात घट होऊन ३६,६९४ रुग्ण उपचारावर असल्याचे दिसून आले. टाळेबंदी लागू झाल्यानंतर रुग्णांपर्यंत पोहचण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जात आहे.

 मृतांमध्ये किंचित घट

मागील दोन वर्षांच्या तुलनेत एचआयव्ही बाधितांच्या मृत्यूंमध्येही किंचित घट झाल्याचे दिसून येते. हे मृत्यू विभागापर्यंत नोंद झालेले आहेत. रुग्णाच्या औषधाबाबत माहिती घेण्यासाठी फोन केल्यानंतर आम्हाला अनेकदा रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते,  अशी माहिती डॉ. आचार्य यांनी दिली.

.....................................
------------------------------

www.freshnewz.in

Comments