जरा मराठी..बाकी काईतं नी..प्रशांत दैठणकर
जरा मराठी..बाकी काईतं नी
सर्वोत्त्तम भाषा म्हणून मराठी भाषा अग्रस्थानी आहे. केवळ ही माझी मातृभाषा आहे म्हणून नाही तर ती खरो
खरच उत्तम भाषा आहे.
कधीकाळी टोळ्यांमधून राहणारा मानव प्राणी कोणती भाषा बोलत असेल याची माहिती नाही पंरतु आपलं ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी चित्रलिपीचा वापर केला. त्यानंतर शिलालेख, शिल्प, लेण्या असा हा प्रवास नंतर भूर्जपत्र असा झाला. चीनने कागदाचा शोध लावला त्यानंतर भाषा आणि लिपीचा विकास झपाट्याने आहे.
मराठी भाषा संस्कृतमधून विकसित झाली आणि हिंदी भाषा देखील. भाषेचा वापर करणाऱ्यांमुळे त्याच वैविध्य येणे आणि वैशिष्ठ्य विकसित होणे असा प्रवास अधिक चांगला झाला. असं म्हणतात की दर दहा कोसांवर भाषा बदलते. आता खूप प्रवास केला तर याची अधिक खात्री पटते.
शासकीय सेवेत येण्यापूर्वी 10 वर्षे पत्रकारिता आणि नंतर 22 वर्षांचा शासकीय सेवेत स्थानबदलाचा अनुभव यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातील मराठी अनुभवायला मिळाली. भाषा मराठीच असली तरी बोलण्याची ढब अर्थात लहेजा यामुळे भाषेचा वेगळेपणा असतो आणि त्यात खुप गोडवा निर्माण होतो असं मी अनुभवलं आहे.
भाषेचा एक अभ्यासक म्हणून याचं विवेचन करताना जाणवतं की खरोखर समाज ज्या मराठीत संवाद साधतो तीच त्याची मराठी अशी व्याख्या करता येईल. मी रशियन भाषा शिकत असताना माझे उझबेकस्थान निवासी शिक्षक सांगायचे की छापील भाषा आणि बोलीभाषा यात अंतर आहे. ग्रामीण भागात ‘नव्हतं’ असं बोललं गेलं तर त्यांने संवाद साधला जातो व अर्थबोध होतो. यासाठी प्रमाणभाषा किंवा छापील भाषा अपुरी पडत असते.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरताना बोली भाषेतल्या अनेक गंमती समोर आल्या. प्रसार माध्यमे प्रमाण भाषा म्हणून मराठीचा वापर करतात मात्र त्यात बोलीभाषेचा ‘तडका’ नसेल तर ऐकण्यात आणि वाचण्यात मजा येत नाही. ढोबळ मानाने राज्यात मराठीची ओळख त्या भागांवरुन असते आणि त्या स्थानिक भौगोलिक रचेनशी जोड त्याला असते यानुसार पुण्याची पुणेरी शुध्द म्हणायची का?
मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होतानाच अनेक शहराचे नोकरी आणि व्यवसायामुळे बहुभाषीकरण देखील झाले. यात स्थानिक मराठी भाषा अधिकाधिक नवीन शब्दांचा स्वीकार करणारी भाषा असल्याने मराठीही बदलली हा प्रकार मोठ्या प्रमाणावर मुंबई सारख्या महानगरात दिसून येतो. भाषिक सरमिसळ म्हणायचं की शाब्दीक भेसळ यावर चर्चा होवू शकते मात्र मुंबईची ‘मुंबइय्या’ मराठी एकदम वेगळी बनली आहे.
राज्याच्या इतर भागात देखील वेगवेगळी ओळख मराठीने निर्माण केली आहे. कोल्हापूर कुस्तीगीरांचे शहर पण याठिकाणी कर्नाटकच्या सिमेचा भाग आहे त्यामुळे इथे रांगड्या कोल्हापूरी मराठीला कानडीची लईभारी झालर लागल्याचं चित्र आपणास दिसेल.
बहिणीबाईच्या ‘अरे संसार संसार’ चा परिचय सर्वांना आहे. त्या खानदेशात स्वत:चा खास लहेजा असणारी अहिराणी मिश्रीत मराठी भाषा वेगळी आहे.
आपल्या भाषेची लकब सर्वात जास्त प्रसिध्द करणारा माझा मित्र मकरंद अनासपुरेने खास मराठवाडी भाषेचा परिचय सर्व महाराष्ट्रास दिला. त्या मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला मराठी वेगळ्या पध्दतीने बोलली जाते असे जाणवेल. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही 13 महिने मराठवाडा निजामाच्या हैद्राबाद स्टेटचा भाग होता आणि त्यामुळेच इथल्या मराठीवर उर्दू भाषेचा पगडा मोठा आहे.
साधारणपणे मराठवाड्यात विशेषत: औरंगाबादेत उर्दूचा वापर अधिक. महाराष्ट्रात इतरत्र रुग्णाला रुग्णालयात दाखल करतात औरंगाबादेत मात्र दवाखान्यात शरीक असे बोलले जाते. घरात आपली मातृभाषा मात्र घराबाहेर हिंदी भाषा असा काहीसा प्रकार आपणास दिसेल.
लातूर मराठवाड्याचं शेवटचं टोक. सिमावर्ती भाग इथला मराठीचा थाट वेगळाच आहे..महाराष्ट्रात काय करताय? असं बोललं जात असलं तरी इथं काय करु लालाव.. असा लालाव जोडलेला आपण ऐकाल.
विर्दभातील भाषा देखील भिन्न मराठी आहे. यात पश्चिम विदर्भाची वऱ्हाडी आणि नागपूर सह पूर्व विदर्भाची नागपूरी मराठी वेगळी. त्यातही छत्तीसगड, तेलंगाणा राज्यालगत सिमा भाग असलेल्या गडचिरोलीत मराठीचा बाज वेगळाच आहे. इथं छत्तीसगडीचा प्रभाव असणारी मराठी आणि तेलंगाणाच्या तेलगूचा प्रभाव असणारी मराठी आणि तेलंगाणाच्या तेलगूचा प्रभाव असणारी मराठी वेगळी.
साधारणपणे मराठीत चहा करतात मात्र इथं चहा मांडतात आणि राज्यात जरा कपडे घालून येतो असं बोललं जात असलं तरी इथं मात्र कपडे लावतात..
एकदा कोल्हापूरवरुन बेळगावला जाताना सकाळी नाश्ता करण्यासाठी हॉटेलमध्ये थांबलो त्यावेळी आलू वडा आण म्हणून वेटरला ऑर्डर दिली. त्याने चक्क नाही म्हणून सांगितलं मग त्याला विचारलं की खायला काय आहे तर मेन्यू सांगताना त्याने आलूबोंडा आहे म्हटल्यावर मला भाषिक गुंता उलगडला.
पत्ता सांगताना इतरत्र पुढच्या चौकातून उजवीकडे वळा असं आपण म्हणतो (पुण्यात पत्ता सांगतच नाहीत त्यामुळे पुणे सोडून असे वाचावे) जळगावात पत्ता विचाराल तर धक्का बसतो..पुढं चौकात जायाचं अन उजवीकडे फाकाचं..(आता बोला).
कोकणात आल्यावर मला एक नाही तर अनेक शब्दांचा मला नव्याने परिचय झाला..मासे गिरवणे..अर्थात यापूर्वी सागरकिनारी राहिलो नाही म्हणून असेल कदाचित आणखी एक शब्द म्हणजे साठेखत..मराठवाड्यात याला बयाणा तर इतरत्र इसार म्हणतात.
उपविभागीय अधिकाऱ्यांसमवेत इतकी वर्षे संपर्क आलेल्या मला रत्नागिरीत आल्यावर प्रथमच प्रांत शी संपर्क आला त्याचवेळी लक्षात आलं की हा प्रांत वेगळा आहे आणि सोबतच हा आपला प्रांत नाही.
सर्व ठिकाणी साधारणपणे वेडा, पागल म्हणून हिणवलं जातं असले तरी ती व्यक्ती वऱ्हाडात गेल्यावर भयताड होते आणि वर्धेत बयाड होते..या प्रवासात मला वर्धेच्या मराठीचा लहेजा भावला..आपण काहीतर नाही म्हणतो पण वर्धेच्या मराठीत ते काईतं नी असतं
गंमत मराठीची..दुसरं काईतंनी..!
प्रशांत दैठणकर
जिल्हा माहिती अधिकारी
रत्नागिरी
९८२३१९९४६६

Comments
Post a Comment