कोकणात टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आणण्यासाठी प्रयत्न: शेखर निकम

 ठाणे:कोकणात प्रदूषण विरहित उद्योगधंदे यायला हवेत, तरच निसर्गाचा समतोल टिकून राहील व येथील तरुणांना, महिलांना रोजगार मिळेल, याच प्रमुख उद्देशाने चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांनी आज बुधवारी भिवंडी येथील कोनगाव याठिकाणी अस्मिता टेक्स्टाईल पार्कला भेट दिली. या इंडस्ट्रीजमुळे छोटे-मोठे उद्योगधंदे सुरू होऊन कोकणातील महिलांना चांगला रोजगार देऊ शकतात, या हेतूने या ठिकाणी काही कंपन्यांचे मालक, व्यवस्थापक यांच्याशी आमदार निकम यांनी सविस्तर चर्चा केली. टेक्सटाइल इंडस्ट्रीजची पाहणी केली. महाराष्ट्र शासनाची मान्यता असलेल्या स्कायलॅब लेबॉरेटरी पाहणी केली. पाणी, हवा, ध्वनीप्रदूषण याची तपासणी करण्यासाठी विविध मशनरी याठिकाणी उपलब्ध आहेत. याविषयीही आमदार शेखर निकम यांनी जाणून घेतले. भविष्यात टेक्सटाइल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून छोटे-मोठे उद्योग कोकणात आणण्यासाठी आपले प्रयत्न असतील, आणि यातून महिलांना चांगला रोजगार मिळू शकतो, असे आमदार शेखर निकम म्हणाले. या,वेळी त्यांच्यासोबत विश्वनाथ डांबरे, साकेत व सचिन डांबरे, योगेश शिर्के, सिद्धेश लाड, मनोज जाधव आदी उपस्थित होते. टेक्स्टाईल  इंडस्ट्रीज ही सर्वात मोठी इंडस्ट्रीज मानली जाते. कापड उद्योगात या इंडस्ट्रीजच्या माध्यमातून मोठे काम केले जाते. येथील कपडे परदेशातही निर्यात होतात. त्यामुळे अशा प्रकारचे उद्योग कोकणात आले तर नक्कीच येथील महिलांच्या हाताला रोजगार मिळेल व कोकणचा कायापालट यातून होऊ शकतो, असा विश्वास आमदार निकम यांनी या वेळी व्यक्त केला.



Comments