सुरजागड कंपनीत कार्यरत २६ वर्षीय तरुणीची संशयास्पद आत्महत्या; घातपाताचा संशय?

सुरजागड कंपनीत कार्यरत २६ वर्षीय तरुणीची संशयास्पद आत्महत्या; घातपाताचा संशय?
​आलापल्ली:
चामोर्शी तालुक्यातील मार्कडा येथील मूळ रहिवासी आणि सध्या आलापल्ली येथे वास्तव्यास असलेल्या एका २६ वर्षीय तरुणीने राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्नेहा हिवराज कुमरे असे मृत तरुणीचे नाव असून, ती स्थानिक सुरजागड कंपनीच्या खमनचेरू स्टॉकयार्डमध्ये 'डाटा एन्ट्री ऑपरेटर' म्हणून कार्यरत होती.
​नेमकी घटना काय?
बुधवारी, १५ जुलै रोजी रात्री १०:४० च्या सुमारास घरमालकिणीने स्नेहाच्या आईला फोन करून तिने ओढणीच्या सहाय्याने सिलिंग फॅनला गळफास घेतल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तिला उपचारासाठी अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, गुरुवारी पहाटे १:०० वाजताच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
​प्रेमसंबंधांची चर्चा, घातपाताचा संशय
मृत स्नेहाचे खमनचेरू येथीलच पोकलेन चालक राहुल रंगाराव घरात (२७, रा. चंद्रपूर) याच्यासोबत प्रेमसंबंध होते. दोन्ही कुटुंबांनी या विवाहाला संमती दिली होती, त्यामुळे सर्व काही सुरळीत सुरू असताना तिने टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकरण आत्महत्या आहे की नियोजित हत्या, या चर्चेने परिसरात खळबळ उडाली आहे. स्नेहाला कोणी आत्महत्येस प्रवृत्त केले का, या दिशेनेही तपास होणे गरजेचे असल्याचे नातेवाईकांकडून बोलले जात आहे.
​पोलीस तपास सुरू
या प्रकरणी मृत तरुणीच्या आईच्या फिर्यादीवरून अहेरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (मर्ग क्र. ३१/२०२६, कलम १९४ बी.एन.एस.एस.) करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक हर्षल ऐकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिनेश येवले आणि मनिषा मुलकवार पुढील तपास करत आहेत. या घटनेतील गुढ उकलण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

टिप्पण्या

news.mangocity.org