सुरजागड लोहप्रकल्प कंपनीने घेतला आणखी एक बळी! ट्रकच्या धडकेत तानबोडी येथील १७ वर्षीय निष्पाप युवकाचा जागीच मृत्यू
सुरजागड लोहप्रकल्प कंपनीने घेतला आणखी एक बळी! ट्रकच्या धडकेत तानबोडी येथील १७ वर्षीय निष्पाप युकाचा जागीच मृत्यू
By दिपक चुनारकर
अहेरी(गडचिरोली):-
सुरजागड लोहप्रकल्पाच्या अवजड वाहतुकीने ग्रामीण भागात धुमाकूळ घातला असून, आज पुन्हा एकदा एका निष्पाप प्राणाचा बळी गेला आहे. विजयपूर येथे झालेल्या भीषण अपघातात सुरजागड लोहप्रकल्प कंपनीच्या भरधाव ट्रकने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात तानबोडी येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय युवकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड संताप आणि तीव्र शोककळा पसरली आहे.
• नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, तानबोडी येथील अवघ्या १७ वर्षांचा रोशन संतोष मडावी हा युवक आपल्या चार मित्रांसोबत आपल्या काही वैयक्तिक कामासाठी विजयपूर परिसरातातून जात होता. याच दरम्यान, सुरजागड लोहप्रकल्पाची वाहतूक करणाऱ्या एका अनियंत्रित आणि भरधाव ट्रकने त्याच्या वाहनाला जोरात धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ट्रकचे दिल्याने युवकाचा जागीच थरारक अंत झाला आणि चार युवकांना जबर जखमा झाल्या.
“सुरजागड लोहप्रकल्पाची वाहतूक म्हणजे सर्वसामान्यांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे,” असा संतप्त आरोप करत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
•’आणखी किती बळी घेणार?’ – प्रशासनाविरुद्ध रोष.
सुरजागड लोहप्रकल्पाच्या वाहनांमुळे होणारे अपघात आणि जाणारे बळी हे आता नित्याचेच झाले आहेत. प्रशासनाचे या सुसाट धावणाऱ्या मृत्यूदूत ट्रकवर कोणतेही नियंत्रण राहिले नसल्याचे चित्र आहे असे म्हणत राजकीय,सामाजिक क्षेत्रातून सोसियल मिडिया वर सदर घटनेचा निषेध केला जात आहे.
“दरवेळी अपघात होतो, निष्पाप कुटुंब उद्ध्वस्त होते, पण प्रशासन आणि कंपनी प्रशासन मात्र सुस्त आहे. या १७ वर्षीय कोवळ्या वयाच्या मुलाच्या मृत्यूला सर्वस्वी ही कंपनी आणि प्रशासन जबाबदार आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.
या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून, संतप्त नागरिकांनी संबंधित दोषी ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्याची आणि पीडित कुटुंबाला त्वरित भरपाई देण्याची मागणी केली आहे. नागरिकांच्या या वाढत्या रोषामुळे प्रशासनाला आता तरी जाग येणार का? की आणखी निष्पाप जीवांची आहुती घेतली जाणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा