मोदीसाहेब काटकसरीने राहण्याचा सल्ला फक्त सामान्य जनतेला देऊ नका, याचे अनुपालन आपले मंत्री आणि सत्ताधाऱ्यांकडून देखील झाले पाहिजे, आमदार नाना पटोले यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य जनतेला इंधन बचत करण्याचा सल्ला दिला मात्र स्वतः ते विविध देशांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजले आहे. सामान्य नागरिकांवर काटकसरीचे आवाहन करताना लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याच तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, असा आशयाचे पत्र काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. नाना पटोले आपल्या पत्रामध्ये म्हणतात की, काल आपल्या भाषणामध्ये आपण देशातील नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचे, इंधनाचा वापर कमी करण्याचे, मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले. देशहिताच्या दृष्टीने नागरिकांनी काटकसरीचा अवलंब करावा, हा संदेश निश्चितच महत्त्वाचा आहे.
मात्र, त्याचवेळी आपण स्वीडन, नॉर्वे, युएई आणि इटली या देशांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजले. तसेच काल तेलंगणा, बेंगळुरू आणि जामनगर येथील आपल्या दौऱ्यांदरम्यान चार्टर विमानांचा वापर करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रॅली आणि वाहनताफ्यांचे आयोजन करण्यात आले होते.
जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत असल्याची बाब आपण अधोरेखित केली आहे. अशा परिस्थितीत इंधन बचतीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवायचा असेल, तर त्याची सुरुवात सरकारकडून होणे आवश्यक आहे. शासकीय दौऱ्यांमध्ये शक्य तिथे काटकसर करणे, चार्टर विमानांचा वापर मर्यादित ठेवणे तसेच वाहनताफे कमी करणे, हा देखील इंधन बचतीसाठी महत्त्वाचा संदेश ठरू शकतो.
सामान्य नागरिकांवर काटकसरीचे आवाहन करताना लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याच तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे आपण स्वतःपासून आणि आपल्या पक्षापासून या उपक्रमाची सुरुवात करावी, ही विनंती. अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा