नरेंद्र महाराजांची ताकद एवढी आहे!.फसलेला अवतार: नरेंद्र महाराज*
*लेखांक क्रमांक १०४५*
*प्रकरण सहावे भाग ३*
*फसलेला अवतार: नरेंद्र महाराज*
दि.३१ मे ९७ रोजी या थोतांडविरोधी निदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चला तर, समाज प्रबोधनाच्या मोहिमेत सामील होण्यास."
साऱ्या तालुक्यात ही पत्रके गेली आणि वातावरण तापले. तासगावचे आमदार आर. आर. पाटील यांना फोनवरून विनंती गेली की, या बुवाच्या व्यासपीठावरून आपण त्याच्या बुवाबाजीच्या विरोधात बोलावे. त्यांना या बुवाच्या असल्या कृत्याची माहितीच नव्हती. ते म्हणाले, 'मी कार्यक्रमास जाऊ यकी नको?' मी सुचविले, 'कार्यक्रमास जाणे न जाणे हा आपला निर्णय आहे; परंतु जर गेलात तर त्याची दुसरी बाजू तेथील उपस्थितांसमोर येणे महत्त्वाचे वाटते, ते आपण पार पाडावे.' पोलीस स्टेशनला बंदोबस्ताची मागणी केली.
३१ मे उजाडला. सर्व वर्तमानपत्रांतून याची ठळक बातमी आल्याने गर्दी अफाट जमली. महाराजांच्या कार्यक्रमस्थळापासून २०० फुटांवर अं.नि.स.ने -मांडव टाकला. सर्व कार्यकर्ते शांतपणे मांडवात बसून पत्रके वाटत होते.
व्याख्याने चालू झाली. महाराजांचे 'भक्तही येऊन ऐकू लागले. तासगावातील जनता उत्स्फूर्तपणे या बुवाबाजीच्या विरोधात जमली. त्यांचा जमाव सरळ घोषणा देत कार्यक्रमस्थळी गेला. स्टेजवर महाराज दोन्ही बाजूस फॅन उभे करून हवा खात बसलेले. मुंडावळ्या बांधलेले नवविवाहित. मांडव खचाखच भरलेला. आमदार आर. आर. पाटील उभे राहून बोलले- "अं.नि.स.चे म्हणणे आहे, त्याचेही उत्तर मिळावयास हवे...."
इतक्यात लग्नात नवरदेवाच्या हातातली तलवार काढून घेऊन, तीन-चार तलवारी घेऊन भगवे फेटे घातलेले महाराजांचे भक्त बाहेर घोषणा देणाऱ्या तासगावच्या नागरिकांच्या जमावाच्या दिशेने तलवारी परजीत धावू लागले. गोंधळ उडाला. तासगावचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराव शिंदे जमावाचे नेतृत्व करीत होते. त्या जमावावर नरेंद्रभक्तांनी तुफानी दगडफेक करण्यास सुरुवात केली. अं.नि.स.च्या मांडवाकडे दगड भिरकावण्यात आले. तासगावमधील एका तरुणास खाली पाडून नरेंद्र भक्तांनी तुडविले. 'कर्मण्येवाधिका.... कदाचन...!'
हिंदू धर्माची ती भगवी पताका ती हीच. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून अं.नि.स.ने लगेच तासगाव पोलीसस्टेशनवर मोर्चा नेला. 'तलवारधारी महाराजांना अटक करा...' या घोषणांनी तासगाव ढवळून निघाले. तासगावच्या जनतेने उत्स्फूर्तपणे तासगाव बंद केले
इकडे नरेंद्र महाराज उद्दामपणे मुलाखत देऊन म्हणाले, "जैसी करणी वैसी भरणी!" अलिशान एअर कंडिशन गाडीतून आलेल्या महाराजांना आव्हान स्वीकारायचेच नव्हते म्हणून हा प्रकार घडविला. आव्हान न स्वीकारता महाराजांनी चंबुगबाळे आवरून नाणीजला पळ काढला...! पण पळ काढण्यापूर्वी महाराजांना एक पत्र अं.नि.स.तर्फे त्यांच्या भक्तांकरवी व तासगाव ठाण्याच्या पोलिसांकरखी पाठविण्यात आले होते. त्यात आज आव्हान स्वीकारता येत नसेल तर पुढची तारीख द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती; पण महाराजांनी तेही स्वीकारले नाही. गजानन महाराजांचे अवतार असे ढिसाळ कसे? शोध घ्यायलाच हवा म्हणून या घटनेनंतर 'श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव' यांना कॉ बाबा आरगडे यांनी महाराष्ट्र अं.नि.स.तर्फे पत्र पाठवून विचारणा केली की, "नरेंद्र महाराज हे स्वतःला गजानन महाराजांचे अवतार समजतात, ते खरे आहे का? त्यांच्या व्यवस्थापकांचे उत्तर आले की, 'रत्नागिरी टाईम्स'च्या १८ जून १९९७ च्या अंकात श्री गजानन महाराज संस्थानाने जाहीर खुलासा दिलेला असून तो असा आहे -
"श्री गजानन महाराज संस्थान, शेगावकडून भक्तांनी विचारणा केल्यावरून हा जाहीर खुलासा भक्तांची फसगत होऊ नये म्हणून करीत आहोत.
नाणीज येथील कोणी स्वतःला श्री गजानन महाराजांचा अवतार आहे, असे भासवून श्री गजानन महाराजांचा बादरायण संबंध जोडून 'श्रीं'च्या मुखातून सर्वसामान्यांच्या उद्धाराकरिता निघालेल्या मंत्राचा सदुपयोगाऐवजी स्वार्थाकरिता त्यांच्याकडून दुरुपयोग होत आहे, असे आढळून आले.
संस्थेच्या माहितीप्रमाणे व येथे येणाऱ्या सत्पुरुषांच्या वाणीतून अगर 'श्रीं'नीही त्याच्या हयातीत असा कधी निर्देश केला नाही की, मी अवतार घेईन. तसेच 'श्रीं'च्या ग्रंथातही तसा उल्लेख आलेला नाही.
सर्व भक्तांना नम्र सूचना की, अशा बाबतीत विश्वास ठेवू नये. स्वतःची सर्व बाबतीत फसगत करून घेऊ नये, ही विनंती.
- व्यवस्थापक, श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, जि. बुलढाणा.
एखाद्या देवतेचा, संताचा अवतार असल्याची बतावणी करून भक्तांना लुटण्याचे उद्योग करणारे बुवा या देशात कमी नाहीत; मग ते झाशीच्या राणीचा अवतार असलेली शरयूबाई असो किंवा 'कलकी' महाराज असो. अवतार ही संकल्पना आमच्या पुराणांनी इथल्या समाजाच्या माथी इतकी बडवली आहे की, आमचा उद्धार करणारे अवतार या पृथ्वीतलावर कधीतरी येतील, याची वाट इथला समाज वर्षानुवर्षे आशाळभूतपणे पाहत आहे. स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास हरवून बसलेला हा समाज स्वातंत्र्याची पन्नास वर्षे उलटली तरी अजून तिथेच कसा, याचे रहस्य या अवतारात आहे आणि म्हणूनच बंडखोर विचार हे सगळ्यात मोठे पाप बनले आहे. मग इथे क्रांती करण्यासाठी दुसऱ्या गांधींची वाट पाहावी लागते. दुसरा गांधी येईपर्यंत आम्ही स्वदेशी इंग्रजांचे गुलामच राहणार ! ही गुलामी नरेंद्र महाराजांचे व त्यांच्यासारख्या अनंत बुवांचे हत्यार आहे. बौद्धिक गुलामगिरी ही शोषणासाठीची सगळ्यात सुपीक जमीन; मग नरेंद्र महाराज प्रत्येक जिल्ह्यात अशा जमिनीवर मठ उभा करणार नाही, तर काय करेल? आणि मग अशा मठाची बेहिशोबी संपत्ती गोळा करण्याची प्रवृत्ती कोणता आयुक्त तपासेल? इथे तर प्रत्येक खात्याचा अधिकारी कोणत्या ना कोणत्या बुवाचा भक्त; मग नरेंद्र महाराजांनी काय घोडे मारले आहे? महाराजांवर छापा घालून अधार्मिकतेचा ठपका कशाला ओढवून घ्यायचा?
तासगाव प्रकरणाची बातमी ठळकपणे आली व अनेक भक्त पुढे आले 'लीलामृता'त ज्यांची नावे होती, अशा भक्तांनी अं.नि.स.ला लिहून दिले की त्यांच्याविषयी जो मजकूर आहे, तो निखालस खोटा आहे.
"मी सौ. माधवी मोहन लिमये असे लिहुन देते की, 'नरेंद्र महाराज लीलामृत' या पोथीतील माझ्यासंबंधी एक प्रसंग लिहिला आहे. तो मजकूर पूर्णपणे खोटा आहे. प्रत्यक्षात मी त्यांना सहज नमस्कार केला असता, त्यांनी माझ्या कान व डोळे याच्यावर मारले. परंतु त्यात लिहिल्याप्रमाणे माझी व्याधी (सोरायसिस) दूर झालेली नाहीच. एवढेच नव्हे, तर त्यानंतर मी त्यांच्याकडे हार-पेढे घेऊन गेलेले नाही. तरी 'लीलामृता'त लिहिलेला माझ्यासंबंधीचा मजकूर पूर्ण खोटा आहे. माझ्या मुलीलाही त्यांनी मुलगा होईल, असे सांगितले; पण प्रत्यक्षात मात्र तिला मुलगीच झाली. अशा प्रकारे चुकीचा मजकूर छापून लोकांची दिशाभूल करणे समाजाच्या दृष्टीने वाईट आहे.
- सौ. माधवी मोहन लिमये (दि. ७ जून १९९७)
'नरेंद्र लीलामृता'ची १९९४ ची प्रत जी निघाली होती, तेव्हा त्याची प्रकाशिका होती, सौ. सुप्रिया नरेंद्र सुर्वे. त्यावर जोरदार टीका झाली आणि १९९६ साली महाराजांनी मग चलाखी करून पत्नीचे नाव बदलून प्रकाशक बनविले गणपत बा. गुरव यांना !
तासगावच्या भक्तांनी महाराजांना पुन्हा तासगावात येण्याचे निमंत्रण दिले, तेव्हा महाराज काही आले नाहीत.
ते येतीलच कशाला? कारण अं.नि.स.ने इथल्या समाजास जागे करण्यास सुरुवात केली आहे. म्हणूनच नरेंद्र महाराजांकडून चालणारे शोषण गडदपणे समाजासमोर आले. असे इतिहासात क्वचित घडते आणि म्हणूनच इतिहासात असे चमत्कार सहजपणे खपविले जातात. अशा चमत्कारांची, महाराजांच्या हेतूंची, त्यांना असलेल्या तथाकथित साक्षात्कारांची कधीही परखड चिकित्सा समाजाने केली नाही. धर्म, अध्यात्म या अफूच्या गोळीने बेधुंद झालेल्या समाजास प्रत्येक महाराज हा देवाचा प्रेषितच वाटतो. त्यात त्याचे दुबळेपण, सामाजिक अस्थिरता आणि भविष्याचा अनिश्चितपणा त्यास भरीस घालतो.
दाभोळ येथे 'एन्रॉन'च्या विरोधात आंदोलन झाले. प्रदूषणाची हाकाटी पिटत सारी जनता रस्त्यावर आली पण नरेंद्र महाराजांच्या बौद्धिक प्रदूषणावर सारी जनता का गप्प आहे....
नरेंद्र महाराजांची ताकद एवढी आहे!
ती ताकद इथल्या समाजास लोळवणारी, भयचकित करणारी आहे. महाराज-बुवा-मांत्रिक असे राकटपणे; पण तेवढ्याच क्रूरपणे शोषण करीत हळूहळू सर्वत्र पसरताहेत. नरेंद्र महाराज हात वर करतो तेव्हा तेव्हा आमचा समाज एकसुरात म्हणत आहे...
गणी गण गणाऽऽत बोतेऽऽ!!
डॉ. प्रदीप पाटील, सांगली
(विशेषांक १९९७)
( महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,प्रकाशित *समग्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती'अंनिवा' तील निवडक लेख खंड २ भाग ६* या पुस्तकातून *असलेला अवतार: नरेंद्र महाराज* या प्रकरणातून साभार टायपिंग सहकार्य - रमेश शकुंतला दौलतराव माने 📞8275924172)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा