देवाचे गोठणे, बारसू परिसरामध्ये मोरांचा अधिवास असताना मोठे प्रकल्प, उद्योग येऊ शकतात? राष्ट्रीय पक्षी मोर- सरकार त्यांचे रक्षण करणार की त्या ठिकाणी उद्योग उभारणार?

राजापूर तालुक्यातील धोपेश्वर, देवाचे गोठणे, सोलगाव, गोवळ, शिवणे खुर्द, बारसू या परिसरात गेल्या काही वर्षांपासून सरकारच्या माध्यमातून एमआयडीसी किंवा रिफायनरी, किंवा अन्य कोणते प्रकल्प आणता येतील का या संदर्भात सरकारच्या माध्यमातून चाचपणी सुरू आहे. त्यासाठी माती परीक्षणाचे काम देखील करण्यात आले होते. मात्र या परिसरामध्ये राष्ट्रीय पक्षी मोर यांचा अधिवास मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचे संवर्धन करणार की त्या ठिकाणी रोजगाराच्या नावाखाली उद्योग उभारणी करणार असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे. 

धोपेश्वर, देवाचे गोठणे, सोलगाव, गोवळ, शिवणे खुर्द, बारसू या परिसरामध्ये मोरांचा अधिवास आहे. अगदी दिवसाढवळा सुद्धा मोर दिसून येतात. मोर हा राष्ट्रीय पक्षी असून वन्यजीव संरक्षण कायद्याच्या (१९७२) अंतर्गत त्यांना सर्वोच्च दर्जाचे संरक्षण देण्यात आलेले आहे. मोरांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्यासाठी सरकारने विशेष संरक्षित क्षेत्रे घोषित केली आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रातील नायगाव मयूर अभयारण्य (बीड जिल्हा) हे खास मोरांच्या संवर्धनासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. एकीकडे सरकार सांगते की मोरांचे संरक्षण झाले पाहिजे. पण सरकार धोपेश्वर, देवाचे गोठणे, सोलगाव, गोवळ, शिवणे खुर्द, बारसू परिसरात उद्योग उभारणी करू पाहत आहे. त्यामुळे धोपेश्वर, देवाचे गोठणे, सोलगाव, गोवळ, शिवणे खुर्द, बारसू  या परिसरात आढळून येणाऱ्या मोरांचे सरकार संरक्षण कसे करणार? या परिसरातील मोरांच्या जैव विविधता टिकवण्यासाठी सरकार काय भूमिका घेणार असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.

टिप्पण्या

news.mangocity.org