रविंद्र तंगडपलीवार ‘हत्याकांडातील’ आरोपीला “48 तासातच” अटक करण्यात अहेरी पोलिसांना यश…

रविंद्र तंगडपलीवार ‘हत्याकांडातील’ आरोपीला “48 तासातच” अटक करण्यात अहेरी पोलिसांना यश…
By dipak chunarkar -January 21, 202605

अहेरी: पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या हत्याकांड प्रकरणात अहेरी पोलिसांनी केवळ 48 तासातच अज्ञात आरोपीचा शोध लावून त्याला अटक केली. नागेपल्ली येथील रविंद्र तंगडपल्लीवार यांच्या खून प्रकरणाचा फरार आरोपी समय्या मलय्या सुंकरी (वय ३५, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.


दिनांक १८ जानेवारी २०२६ रोजी रविंद्र तंगडपल्लीवार (वय ५०, रा. नागेपल्ली) हे आपल्या पत्नीला प्रगती नागरी पतसंस्था, आलापल्ली येथे आरडीचे पैसे भरून येतो असे सांगून घरातून निघाले होते. संध्याकाळपर्यंत ते घरी न परतल्याने पोस्टे पोलीसांकडे तक्रार देऊन त्यांच्याबाबत मिसिंग नोंद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, १९ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९.३० वाजता आलापल्ली-सिरोंचा महामार्ग क्रमांक ३५३ (सी) वरील नागामाता मंदिराजवळील जंगल परिसरात रविंद्र यांचे धारदार शस्त्राने डोके, मान आणि चेहऱ्यावर वार करून खून झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली. यानुसार अहेरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस अधीक्षक गडचिरोली निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक अहेरी कार्तीक मदीरा व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या सूचनांनुसार तयार केलेल्या विशेष पथकाने मुखबिरांच्या माहिती व तांत्रिक तपासाच्या मदतीने हा गुन्हा उघड केला. आरोपी समय्या सुंकरी याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दिनांक २१ जानेवारी रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिसांना २८ जानेवारीपर्यंत रिमांड मंजूर झाला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे हे करीत आहेत.

टिप्पण्या