रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत कथित गैरव्यवहार



रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भ्रष्टाचाराची चौकशी झालीच पाहिजे – अशोकराव जाधव

रत्नागिरी | प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत झालेल्या कथित मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी ठाम मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व शेतकरी कष्टकरी संघटना, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अशोकराव जाधव यांनी केली आहे.

मा. रुपेशजी पवार यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचाराबाबत मांडलेली भूमिका पूर्णपणे योग्य असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. “बँकेत कार्यरत असलेल्या बोगस मजूर संस्थांना रद्द करण्यात यावे, यासाठी मी गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने मागणी करत आहे. मात्र त्या काळात माझ्यासोबत ठामपणे उभे राहणारे लोक नव्हते, हे माझे दुर्दैव आहे,” असेही त्यांनी नमूद केले.

अशोकराव जाधव यांनी पुढे सांगितले की, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुमारे ४५० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी त्यांनी ८ ऑगस्ट २०२३ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाकडे (ACB) अधिकृत अर्ज सादर केला आहे. मात्र, दीड वर्ष उलटूनही अद्याप या अर्जावर कोणतीही ठोस कारवाई किंवा चौकशी सुरू झालेली नाही, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

भरती प्रक्रियेतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करत जाधव म्हणाले की, प्रत्येक उमेदवाराकडून २० ते २३ लाख रुपये लाच घेऊन भरती करण्यात आली आहे. या प्रकरणाची चौकशी होऊ नये म्हणून संबंधित बँकेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापनाने राजकीय आश्रय घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

“या भ्रष्टाचाराविरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून, शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आहे,” असे सांगत “रुपेशजी, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असा स्पष्ट पाठिंबाही अशोकराव जाधव यांनी जाहीर केला.

— आपला,
अशोकराव जाधव
काँग्रेस
अध्यक्ष, शेतकरी कष्टकरी संघटना, महाराष्ट्र राज्य


टिप्पण्या