रत्नागिरी नगरपरिषदेवर एक हाती सत्ता असलेल्या शिवसेनेला आता यावर्षीच्या निवडणुकीत महायुती का हवी आहे? भाजपकडून महायुती बाबत एकही पत्रकार परिषद नाही, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत अशी प्रतिक्रिया वारंवार शिवसेना नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र भारतीय जनता पक्षाकडून रत्नागिरी नगर परिषद निवडणूक महायुती म्हणून लढणार की स्वतंत्र लढणार की मैत्रीपूर्ण लढत म्हणून लढणार याबाबत कुठेही भाजप नेत्यांकडून पत्रकार परिषद घेऊन सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुती होणे ही फक्त शिवसेनेचीच इच्छा आहे का? मागच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना स्वतंत्र लढली आणि रत्नागिरी नगर परिषदेवर एक हाती सत्ता स्थापन झाली होती. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे विरोधी बाकावर बसले होते. मग आता यावेळच्या रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत शिवसेनेला महायुती व्हावी असे का वाटत आहे असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) असे महायुतीचे सरकार आहे. परंतु जसजश्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या तसतशा राज्य स्तरीय नेत्यांचा सूर बदलू लागला. देवेंद्र फडणवीस अनेकवेळा म्हणाले की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होतील. कुणीही कठोर शब्दात एकमेकांवर टीका करू नये अशा सूचना देखील दिल्या होत्या. त्यावरून असे लक्षात आले की कोकणात देखील असे काहीतरी घडू शकते. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपकडून आमची ताकद जिल्ह्यात वाढली आहे असा सूर येऊ लागला. आता तशीच भूमिका रत्नागिरीत देखील भाजपकडून घेतली जात आहे. सुरुवातीला भाजपकडून रत्नागिरी नगर परिषदेवर थेट नगराध्यक्ष पदाचीच मागणी करण्यात आली होती.
आता शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीचे सूर आहेत. मात्र असे असले तरी देखील भाजप जिल्हाध्यक्षांचा राजीनामा अजूनही चर्चेचा विषय ठरत आहे. शिवाय भाजपकडून मीडियावर एकही बाईट, एकही प्रतिक्रिया, किंवा पत्रकार परिषद झालेली नाही. त्यामुळे भाजपालाच रत्नागिरीत महायुती हवी आहे का की नको आहे असे उलट सुलट सवाल उपस्थित केले जात आहेत.
Comments
Post a Comment