फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना*
फुलनार कॅम्प गुंडूरवाही येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना*
![]()
१००० हून अधिक कमांडो-जवानांच्या मदतीने एका दिवसात उभारणी; विकास आणि सुरक्षेसाठी मैलाचा दगड
गडचिरोली : माओवादग्रस्त अतिदुर्गम गडचिरोली
जिल्ह्यात विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांना आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने एक मोठे पाऊल उचलले आहे. रविवारी (दि.२३) भामरागड उपविभागांतर्गत फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली आहे.
हे नवीन पोलीस मदत केंद्र भामरागडपासून केवळ २० किमी अंतरावर आणि छत्तीसगड सीमेपासून फक्त ७किमी अंतरावर आहे. या धोरणात्मक स्थानामुळे अतिदुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा वाढून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या एका दिवसात संपूर्ण पोलीस मदत केंद्राची उभारणी पूर्ण करण्यात आली. यासाठी एकूण १०५० मनुष्यबळ, ०४ जेसीबी, ०७ ट्रेलर, ०२ पोकलेन, २५ ट्रक यांचा वापर करण्यात आला. सुरक्षा आणि सोयीसुविधांच्या दृष्टीने केंद्रात वायफाय, पोर्टा कॅबिन, आर. ओ. प्लांट, मोबाईल टॉवर आणि पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉलची उभारणी करण्यात आली आहे.
नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे मौजा फुलनार व मौजा कोपर्शी येथील अडकलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम आता पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच, वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यकाळात या भागात नवीन रस्ते बांधकाम आणि एस. टी. बस सेवा सुरू करणे शक्य होणार आहे.
उभारणी कार्यक्रमादरम्यान आयोजित जनजागरण मेळाव्यात फुलनार आणि परिसरातील नागरिकांना साड्या, ब्लॅकेट, स्वयंपाक भांड्यांचा संच, मच्छरदाणी, शालेय साहित्य (युवक व मुलांसाठी) आणि क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात आले. नवीन पोलीस मदत केंद्राच्या स्थापनेमुळे नागरिकांनी संतोष व्यक्त करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले आहेत.
११ डिसेंबर २०२४ रोजी पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र. ३० जानेवारी २०२५ रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन. ०९ मार्च २०२५ रोजी कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करून पोलिसांनी अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण केली आहे.
यावेळी अप्पर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उप-महानिरिक्षक (अभियान), सीआरपीएफ अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, कमांडण्ट ३७ बटा. सीआरपीएफ दाओ इंजीरकन कींडो, अपर पोलीस अधीक्षक एम. रमेश, सत्य साई कार्तिक, गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, भामरागड अमर मोहिते व पोलीस मदत केंद्र फुलनार (कॅम्प गुंडुरवाही) चे नवनियुक्त प्रभारी अधिकारी सपोनि. युवराज घोडके, इतर अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते
Comments
Post a Comment