कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा- आवाहन जिल्हाधिकारी मनुज जिंदल,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये
रत्नागिरी : कुष्ठरुग्ण शोध अभियानांतर्गत प्रभात फेरी व रांगोळी स्पर्धा – वायंगणी येथे उत्साहपूर्ण प्रतिसाद
प्राथमिक आरोग्य केंद्र पावस व उपकेंद्र गोळप ता.रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वायंगणी येथे कुष्ठरुग्ण शोध अभियान अंतर्गत विविध जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष कांबळे व डॉ. अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमास विद्यार्थ्यांसह पालकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन कुष्ठरोगाबाबत जागृतीपर संदेश दिले. त्यानंतर रांगोळी स्पर्धा घेण्यात आली व विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना कुष्ठरोगाची कारणे, लक्षणे, निदान व उपचारपद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच टीबी मुक्त भारत अभियान, जलजन्य आजार, किटकजन्य आजारांपासून बचाव, याविषयी आरोग्य शिक्षणही देण्यात आले.
या कार्यक्रमात आरोग्य सहाय्यक बापुराव दराडे, समुदाय आरोग्य अधिकारी विनीत सातोपे, आरोग्यसेवक गणेश घाणेकर, आरोग्यसेवक संतोष डांग, आशासेविका सौ. प्राजक्ता लिंगायत, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. दिपाली माळी, शिक्षकवृंद व पालकवर्ग उपस्थित होते.
त्वचेवर फिकट किंवा लालसर बधिर चट्टा, त्या ठिकाणी घाम न येणे,
त्वचा जाड, तेलकट किंवा गाठीदार होणे,कानाच्या पाळ्या जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे,डोळे पूर्णपणे बंद करता न येणे,तळहात व तळपायावर मुंग्या येणे, बधिरपणा किंवा जखमा होणे,हात व पायाची बोटे वाकडी होणे, मनगटापासून लुळे पडणे,त्वचेस थंड-गरम संवेदना न जाणवणे,हातातून वस्तू गळून पडणे, चालताना चप्पल गळून पडणे अशी कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यास जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा स्तरावरून जिल्हाधिकारी मनुज जिंदल,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
-डॉ अनिरुद्ध आठल्ये,
जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद रत्नागिरी
Comments
Post a Comment