जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर, राजापूरचे अधिकारी आहेत कुठे?, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय नुकसानग्रस्त भागाची पाहणी कधी करणार?

राजापूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना राजापूर तालुक्यातील उपविभागीय कार्यालय तथा प्रांत कार्यालयाचे अधिकारी तसेच राजापूर तहसील कार्यालयाचे अधिकारी नेमके कुठे आहेत असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी रत्नागिरी तालुक्यात व जिल्ह्यात काही ठिकाणी शेताच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. मात्र राजापूर तालुक्यातील अधिकारी अशा पद्धतीने पाहणी करताना कुठेही दिसून आले नाही किंवा कशा प्रकारचे फोटो पत्रकारांपर्यंत पोहोचले नाही. आता हेच अधिकारी कदाचित निवडणुकीचे कारण सांगून आम्ही जाऊ, आम्ही जाऊ अशी उत्तरे देतील. पण आता बहुतांशी ठिकाणी भात शेतीची कापणी झाली आहे. 

राजापूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे कापून ठेवलेल्या भाताचे त्याचप्रमाणे शेतात उभ्या असलेल्या भाताचे, आणि नाचणी पिकाचे नुकसान झाले आहे. काही गावात तर प्रशासनाने ग्रामपंचायतिच्या ग्रामसेवकांनाच पंचनामे करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे. खरे तर भात शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तहसील प्रशासन आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने करायचे असते. मात्र यावर्षी कृषी विभागाकडून अशा पद्धतीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी झाल्याची कुठे दिसून आलेले नाही. 

नुकसान झालेल्या भात शेतीच्या पाहणी करण्यासाठी कुठल्या नेत्याच्या किंवा मंत्र्यांच्या आदेशाची आवश्यकता आहे की काय असा सवाल सध्या राजापूर तालुक्यात उपस्थित करण्यात येत आहे. 

Comments