प्रस्थापित राजकीय पक्षांकडून रिपब्लिकन गटांना बेदखल करणे अन्यायकारक - राजूभाई जाधव*

*प्रस्थापित राजकीय पक्षांकडून रिपब्लिकन गटांना बेदखल करणे अन्यायकारक - राजूभाई जाधव*

*नगरपरिषद,नगरपंचायत निवडणूक - २०२५*  

चिपळूण (प्रतिनिधी) : राज्यात नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांची धामधूम सुरू आहे. त्यामध्ये महायुतीसोबत असणारे, महाविकास आघाडीसोबत असणारे तथा स्वतंत्रपणे असणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या गटांना प्रस्थापित राजकीय पक्षांनी जागावाटपात पूर्णतः बेदखल केल्याचे दिसून आले. केवळ मतांसाठी आंबेडकरी चळवळीतील लोकांचा, पक्षांचा वापर करून घेणे व स्थानिक पातळीवरील निवडणुकातही योग्य तो न्याय न देणे ही भूमिका अत्यंत अन्यायकारक व चीड आणणारीअसून त्याचा विचार आंबेडकरी चळवळीतील राजकीय पक्षांनी, रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी गंभीरपणे करण्याची आवश्यकता आहे, असे स्पष्ट प्रतिपादन चिपळूण मधील सामाजिक - राजकीय, रिपब्लिकन कार्यकर्ते राजूभाई जाधव यांनी केले आहे. 

राज्यात नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेले आहेत. सर्व राजकीय पक्ष या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरलेले आहेत. विशेषतः सत्ताधारी महायुती - भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या प्रमुख पक्षांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) सोबत आहे, तर महाविकास आघाडी शिवसेना (उद्धव ठाकरे ), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), काँग्रेस यासोबत आरपीआय (गवई गट) आरपीआय (खरात गट) व इतर रिपब्लिकन गट सोबत आहेत. काही रिपब्लिकन गट व इतर आंबेडकरी चळवळीतील पक्ष वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी व इतर स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. मात्र या स्थानिक निवडणुकांमध्ये सर्वच प्रस्थापित पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले असताना आपल्या छोट्या मित्र पक्षांचा त्यांना विसर पडलेला आहे. सत्ताधारी आणि विरोधात आघाडीला साथ देणाऱ्या रिपब्लिकन गटांना, आंबेडकरी चळवळीतील इतर पक्षांना दोन्हीकडून अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचे दिसून आले आहे. इतकेच नव्हे तर पूर्णतः बेदखल करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट निरीक्षण राजू भाई जाधव यांनी मांडले आहे. ही बाब आंबेडकरी चळवळीसाठी अत्यंत हानिकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारमध्ये आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले मंत्री म्हणून समाविष्ट आहेत. आरपीआय आठवले हा पक्ष केंद्रात व राज्यातील सत्तेचा घटक पक्ष आहे. मात्र त्यांच्या पक्षालाही राज्यात सर्वत्र डावलण्यात आले आहे. कुठेच योग्य तो सन्मान करण्यात आलेला दिसून येत नाही. तीच तऱ्हा प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची झालेली आहे. इतर रिपब्लिकन गटांनाही हाच अनुभव आलेला दिसतो. फक्त वंचित बहुजन आघाडी या पक्षाची काही ठिकाणी विविध पक्षांसोबत युती झाल्याचे दिसून येत आहे. मात्र तेही अपवादात्मक ठिकाणी. त्यामुळे एकूणच आंबेडकरी चळवळीतील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांना प्रस्थापित राजकीय पक्षांकडून अन्यायकारक वागणूक मिळाल्याचे दिसून आले आहे. आंबेडकरी मतांचा फक्त आपल्या फायद्यासाठी वापर करून घ्यायचा व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचे हीच पद्धत सर्वत्र दिसून येत आहे.

 त्यामुळे आंबेडकरी चळवळीतील सर्वच राजकीय पक्षांनी, रिपब्लिकन पक्षाच्या गटांनी, त्यांच्या कार्यकर्त्यांनी, नेतृत्वाने गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या पक्षाला व चळवळीला जिवंत ठेवायचे असेल तर ठाम भूमिका घेऊन येणाऱ्या काळात उभे राहावे लागेल. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका तर आता हातातून गेले आहेत. मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका, महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आंबेडकरी पक्षांनी एकत्र येऊन आपले प्रतिनिधी निवडून आणण्यासाठीची रणनीती आखण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत राजू भाई जाधव यांनी व्यक्त केले. त्याचप्रमाणे अन्याय करणाऱ्या प्रस्थापित राजकीय पक्षांना या निवडणुकीत आंबेडकरी जनतेने धडा शिकवावा, असेही आवाहन त्यांनी केले.

Comments