राजापूर नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस महाविकास आघाडीकडून ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी सादर केला उमेदवारी अर्ज

राजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने थेट नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या महाविकास आघाडी कडून माजी विधान परिषद सदस्य, ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. आज सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत आहे. महाविकास आघाडी कडून निश्चित केलेल्या उमेदवारांचा उमेदवारी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया चालू आहे. 

राजापूर तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये सकाळी नऊ वाजता महाविकास आघाडीचे सर्व नेते व कार्यकर्ते उपस्थित राहून त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार व अभिवादन करण्यात आले. त्यानंतर जवाहर चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर घायलशा बाबा दर्ग्याला फुलांच्या माळेची चादर चढवण्यात आली आणि प्रार्थना केली. त्यानंतर महाविकास आघाडीचे सर्व उमेदवारांनी राजापूर नगर परिषदेमध्ये जाऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सुरुवात केली. 

यावेळी माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे, शिवसेनेचे माजी आमदार गणपतराव कदम, काँग्रेस तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, ॲड. जमीर खलिफे, दिलीप फोडकर, देवदत्त वालावलकर, अनंत फणसे, मलिक गडकरी, रघुनाथ आडीवरेकर, संजय पवार, चंद्रप्रकाश नकाशे, काँग्रेस शहराध्यक्ष अजीम जैतापकर, सुभाष बाकाळकर, शाईबाज खलिफे, अनिल कुडाळी, संगीता चव्हाण, विनय गुरव, अभिजित तेली, रवी डोळस, सुलतान ठाकूर आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

Comments