राजापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले पण महायुतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कोण? निष्ठावंत की आयात केलेले? भाजपला जागा किती? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक लागली असून उद्या सोमवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. राजापूर शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अशी महाविकास आघाडी जाहीर झाली असून निवडणुकीतील त्यांची रणनीती जवळपास निश्चित झालेली आहे. मात्र राजापुरात शिवसेना आणि भाजप यांची महायुती अधिकृतरित्या जाहीर झालेली नाही. त्यामुळे राजापुरात महायुतीचा नगराध्यक्ष पदाचे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार हे कोण असतील? निष्ठावंत असतील की आयत्या वेळी पक्ष प्रवेश करून आयात केलेले असतील असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. 

राजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपला फारशा जागा मिळत नसल्याचे बोलले जात असून अनेक भाजप कार्यकर्ते नाराज आहेत. राजापूर नगर परिषद निवडणुकीत भाजपकडून कुणीही अद्याप नेता दिलेला नाहीये किंवा निरीक्षकही देण्यात आलेले नाहीत. रत्नागिरीत जसे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पदवीधर शिक्षक आमदार निरंजन डावखरे येऊन गेले तसे राजापुरात भाजपचे नेते आलेलेच नाहीयेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट उलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

केंद्रात आणि राज्यात महायुतीची एकहाती सत्ता असून देखील राजापूर नगर परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे त्रांगडेच असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून दहा ते बारा जागा मागण्यात आल्या होत्या. मात्र भाजपला दोन ते तीन जागा देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे संपूर्ण राजापूर शहरातील भाजप कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.

Comments