कोदवली येथे भांडी नेण्यासाठी आलेल्या लोकांना उन्हातच ताटकळत उभे राहावे लागले, ना आसन व्यवस्था, ना पाण्याची व्यवस्था, कामगार आयुक्त कार्यालयाच्या कारभाराचा सर्वसामान्यांना फटका

राजापूर तालुक्यातील कोदवली येथे इमारत व बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत भांडी मिळणार असा मेसेज आल्यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कोदवली येथे हजारोंनी लोक जमले. या जमलेल्या लोकांना सकाळी आठ वाजल्यापासून उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची लोकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही. कामगार आयुक्त कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराचा फटका सर्वसामान्य लोकांना बसला असल्याचे या सर्व ग्रामस्थांमधून बोलले जात आहे. काही लोक तर लांजा तालुक्यामधून सुद्धा आले होते. या सगळ्या लोकांना उन्हातच उभे राहावे लागले. तर काही लोकांना काल रात्री पाऊस पडला असल्यामुळे त्या ठिकाणी चिखलातच उभे राहावे लागले. 

इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना भांडी मिळणार म्हणून कोदवली येथे लोकांना येण्यास सांगितले. मात्र आयत्यावेळी लोकांना भांडी मिळणारच नसल्याची माहिती संबंधित एजन्सीने दिली. त्यामुळे आता जमलेल्या सर्व लोकांची केवायसी करणार असे सांगण्यात आले. मात्र केवायसी करण्यासाठी किती वेळ लागेल, त्यासाठी काही नंबर काढण्यात आले होते का? यासंबंधी उपस्थित लोकांना कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आली नाही. त्या ठिकाणी कामगार कल्याण आयुक्त कार्यालयाचा एकही अधिकारी उपस्थित नव्हते. लोकांना जर विचारायचे झाल्यास नेमके कोणाला विचारायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला. 

खरंतर हे सर्व काम शासनाने महा-ई-सेवा केंद्र मार्फत करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. मात्र राजापूर शहरात जवाहर चौक परिसरात महा-ई-सेवा केंद्र असताना देखील सर्व लोकांना कोदवली येथे का बोलवण्यात आले? ग्रामीण भागातून येणारे लोक सर्वप्रथम जवाहर चौक येथे उतरतात. कोदवली सेंटर ठेवल्यामुळे लोकांना शंभर दीडशे रुपये खर्च करून रिक्षाने किंवा एसटी बसने जवाहर चौक ते कोदवली असा प्रवास करावा लागला. एक रुपयाची ही योजना लोकांना काही शेकडोनी हजारोंनी रुपयांना पडली अशी ओरड या लोकांमधून सुरू आहे. 

कामगार कल्याण आयुक्त कार्यालयाचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित असते तर लोकांना उन्हात उभे राहावे लागले नसते. त्या ठिकाणी लोकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मिळाली असती. परंतु कामगार कल्याण आयुक्त चे अधिकारी त्या ठिकाणी नव्हते. त्यामुळे या संपूर्ण संबंधित दिवसभरातील घटनांमुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे सदर घटनेची जिल्हाधिकारी यांनी चौकशी करावी अशी मागणी ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जे महा-ई-सेवा केंद्र आहे ते महा-ई-सेवा केंद्र नेमके कोणत्या गावासाठी मंजूर आहे, त्या महा-ई-सेवा केंद्राच्या लोकांना कोदवली येथे इमारत बांधकाम कामगार कल्याण योजनेची लाभार्थ्यांची केवायसी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती का याचीही चौकशी करण्यात यावी अशी ही मागणी आता होऊ लागली आहे. 

Comments