राजापूर तालुक्यातील चिरे खाणींना परवानगी देण्यास सुरुवात, पण त्या नियमात असतील ना, त्यांची वेळोवेळी तपासणी होणार ना?
राजापूर तहसील कार्यालय आणि राजापूर प्रांत कार्यालयाच्या वतीने याही वर्षी चिरे खाणींना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. चिरा इंडस्ट्री मोठी आहे त्यातून खूप मोठी रोजगार निर्मिती होते असे नेहमीच महसूल प्रशासनाकडून सांगितले जाते. मात्र चिरे खाण मालक शासनाचे सर्वच्या सर्व नियम पाळतात का असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे.
राजापूर तालुक्यातील चिरे खाणींना परवानगी देण्यात येत आहे. मात्र चिरे ओव्हरलोड ट्रक भरून वाहून नेणार नाहीत ना याची हमी प्रशासनाकडून घेतली जाणार का? मागील वर्षी संगमेश्वर तालुक्यात चिऱ्याने भरलेला ट्रकचा अपघात झाला होता अशी माहिती आहे. ओव्हरलोड चिरे वाहतुकीमुळे रस्त्यांची वाट लागत आहे त्यामुळे सामान्य लोकांना खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो.
त्याचप्रमाणे मंडळ अधिकारी आणि तलाठी यांच्याकडून चिरे खाणींची वेळोवेळी तपासणी केली जाते का? रॉयल्टीमध्ये फसवणूक होत नाहीये ना याची माहिती कलेक्टर ऑफिस पर्यंत वेळोवेळी दिली जाते का? चिरे खाण मालकांना जे पास दिले जातात त्याचा वापर नियमानुसार होतो का? चिरे खाणींच्या ठिकाणी परप्रांतीय कामगार किती आहेत? खाणींच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का? कामगारांचा विमा काढला जातो का? असे सवाल उपस्थित होत असून जिल्हाधिकारी कार्यालयाने सुद्धा यासंदर्भात काहीतरी नियंत्रण ठेवले पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment