राजापूर नगर परिषदेत युवा कार्य प्रशिक्षण मधल्या उमेदवारांचा कालावधी संपला तरी ते अजून तिथेच काम करत आहेत? त्यांना पगार कोण देत आहेत?
राजापूर नगर परिषदेत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानातून भरती केलेल्या दोन ते तीन कर्मचाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आला तरी ते कर्मचारी अजूनही राजापूर नगर परिषदेत काम करत असल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे की या मुलांना राजापूर नगर परिषदेने डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कंत्राटी स्वरूपात भरती करून घेतले आहे. असे असेल तर मग डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून या कर्मचाऱ्यांना भरती करत असताना त्याचे टेंडर काढले होते का? कंत्राटी स्वरूपाच्या भरतीची प्रक्रिया नेमकी काय होती? अशी विचारणा आता जनतेमधून होऊ लागली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानांतर्गत संपूर्ण राज्यभरातील युवकांना त्या ठिकाणी नोकरी देण्यात आली होती. सर्व शासकीय कार्यालयामध्ये ठराविक कालावधीसाठी त्यांना नियुक्त करण्यात आले होते. राजापूर नगर परिषदेमध्ये देखील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अभियानांतर्गत दोन ते तीन उमेदवारांना नियुक्त करण्यात आले होते. मात्र या नियुक्त कर्मचाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आलेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्शिक्षण मधल्या उमेदवारांचा कार्यकाळ संपला त्या उमेदवारांनी ते कार्यालय सोडले आहे. मग राजापूर नगर परिषदेतच हे उमेदवार अजूनही कसे काय काम करत आहेत असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. या कर्मचाऱ्यांना पगार कोण देतो आहे? ठेकेदारी पद्धतीवर यांची नेमणूक करण्यात आली आहे का? नेमणूक करण्यात आली असेल तर शंभर दिवस कृती आराखड्यातर्गत त्या कर्मचारी भरतीची जाहीर नोटीस काढण्यात आली आहे का? कि ते कर्मचारी अनधिकृत पद्धतीने राजापूर नगर परिषदेत काम करत आहेत? या संदर्भात नोटीस बोर्डवर कुठल्याही प्रकारची नोटीस लावण्यात आलेली नाही. जर राजापूर नगर परिषदेला कंत्राटी स्वरूपात डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून उमेदवारांची भरती करायची होती तर शासनाच्या नियमाप्रमाणे भरती केली का नाही? असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
Comments
Post a Comment