शिवसेनेत असंतोषाची लागली ठिणगी; प्रभाग क्रमांक एक मधून होणार पहिला उठाव?
रत्नागिरी | प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरदार वाहू लागले असतानाच, शिवसेनेच्या स्थानिक पातळीवर असंतोषाचे वादळ उठले आहे. पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू असल्याने काही कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला ऊत आला आहे.
प्रभाग क्रमांक एक मधून हा उठाव होण्याची शक्यता असून, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात, आणि त्याआधीच सर्वच पक्षांत उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. मात्र, काही प्रभागांमध्ये जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना बाजूला ठेवून निर्णय घेतले जात असल्याने नाराजी तीव्र होत आहे.
कार्यकर्त्यांच्या मते, पक्षासाठी झटणाऱ्या आणि अनेक वर्षे मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना अंधारात ठेवून काही मंडळी स्वहितासाठी निर्णय घेत आहेत. अशा मनमानी कारभारामुळे असंतोष उसळला असून, काही पदाधिकारी आता बंडाच्या पवित्रत आले आहेत.
याच पार्श्वभूमीवर, नाराज कार्यकर्त्यांवर भाजप तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची नजर लागली आहे. काही पदाधिकारी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा रंगत आहे.
प्रभाग क्रमांक एक मधून हा पहिला उठाव होण्याची शक्यता व्यक्त होत असून, मनमानी कारभार करणाऱ्या आणि मोठे पद मिळवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या स्थानिक नेत्याला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
याकडे वेळीच पालकमंत्री उदय सामंत यांनी लक्ष न दिल्यास, हा असंतोष पुढे मोठ्या बंडाळीत परिवर्तित होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
Comments
Post a Comment