राजापूर तालुक्यात महायुती म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशीच स्थिती झाली आहे

राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुती म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशा स्थितीमध्ये असलेली माहिती दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार नारायण राणे यांचे एका राजकीय पक्षाने कामच केले नसल्याचे बोलले जात होते. विधानसभा निवडणुकीत मात्र शिवसेना आणि भाजपच्या महायुतीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. मात्र केंद्रात आणि राज्यात महायुती असली तरीसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढणार किंवा मैत्रीपूर्ण लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे राजापूर नगरपरिषद असेल किंवा आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप महायुती कशी काय टिकून राहील हे येणारा काळच सांगेल. तर दुसरीकडे पक्षप्रवेशाचा धुमधडाका लावलेल्यांचा राजकीय भविष्यकाळ काय असेल हे येणाऱ्या निवडणुकांमध्येच दिसून येईल. 

राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघांमध्ये एका सत्ताधारी पक्षाकडून पक्षप्रवेशांचा धुमधडाका लावला जात आहे. राजापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न असेल, वाटुळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल चा प्रश्न, राजापूर तहसील कार्यालयातील नवीन प्रांत कार्यालयाचे इमारतीच्या प्रश्न, या प्रमुख प्रश्नांसह ग्रामीण भागातील सर्व सार्वजनिक बांधकाम व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये रस्ते, जलजीवन मिशन योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, प्राथमिक शाळांच्या इमारत दुरुस्ती व नवीन इमारत बांधकामांचे प्रश्न हे काय सुटलेले दिसून येत नाहीये. मात्र ज्या ठिकाणी पक्षप्रवेश करायचे आहेत त्या ठिकाणी मात्र रस्त्यांच्या कामाला तात्काळ मान्यता देऊन जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून लगेचच टेंडर व वर्क ऑर्डर देण्यात येत आहेत. 

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमच्याच पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य जास्तीत जास्त निवडून आले पाहिजेत असे जणू काही टार्गेटच देण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाकडून सहाच्या सहा जिल्हा परिषद गटांमध्ये चाचपणी सुरू असल्यामुळे काही राजकीय पक्षांमध्ये धडकी भरली आहे. त्याचप्रमाणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या वतीने देखील सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती गणांमध्ये उमेदवार उभे करून शतप्रतिशत निवडून आणण्याचा चंग बांधला जात आहे. 

मात्र असे सगळे राजकीय परिस्थिती असली तरी सुद्धा राजकारणात काही सांगता येत नाही. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका व नगरपरिषद निवडणुका कशाप्रकारे रंगतदार होतील हे येणारा काळच सांगेल.

Comments