रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग उदासीन
रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा शासन निर्णय झाला. मात्र अजूनही बऱ्याच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले नाहीत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास प्राथमिक शिक्षण विभाग उदासीन असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पालकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, त्याचप्रमाणे शाळांमध्ये काही गैरप्रकार होऊ नये म्हणून शासनाने काही ठोस पावले उचलली होती. त्याच्याच अनुषंगाने सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला होता. रत्नागिरी जिल्हा परिषदेने सुद्धा प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत धोरण ठरवले होते. रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामीण भागात प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांची संख्या मोठी आहे. त्यामुळे किती शाळांमध्ये किती सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत याबाबत सगळा आराखडा तयार करण्यात आला होता.
मात्र रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळांमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभागाला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची काळजी नाही का असाही सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे राज्याच्या गृहमंत्र्यांनी आता या विषयात लक्ष घालून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे अशा अपेक्षा जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment